पैठण येथील संत एकनाथ महाराज यांची फाल्गुन वद्य षष्ठी ही पुण्यतिथी आहे. या दिवसालाच नाथषष्ठी असे म्हणतात. वारकरी संप्रदायातील सर्वच संताचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची परमेश्वरावर असणारी निस्सीम भक्ती. ही भक्ती भावयुक्त होतीच, पण ती निष्काम भक्तीही होती. म्हणूनच त्यांनी समस्त मानवाचेच कल्याण व्हावे हीच कामना केली. त्यासाठी संत वचनच आहे.
जगाच्या कल्याणा। संतांच्या विभूती।
देह कष्टविती। परोपकारे॥
याच संत मांदियाळीतील एक म्हणजे संत एकनाथ महाराज. शके १५३३ मध्ये पैठण येथे त्यांचा जन्म भक्ती परंपरा लाभलेल्या भक्त भानुदास यांच्या घराण्यात झाला. लहानपणीच आई-वडील यांच्या स्वर्गवासानंतर त्यांचा सांभाळ त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनीच केला. त्यांच्या कडूनच त्यांचे पणजोबा भानुदास महाराज यांच्या भक्ती विषयी संस्कार नाथांच्या मनावर झाले. वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी त्यांची भेट देवगिरीचे जनार्दनस्वामी महाराजांशी झाली. त्यांच्याकडेच नाथ राहिले व त्यांची अखंड सेवा केली. तेथेच नाथांची अध्यात्मिक जडणघडण झाली. असे म्हणतात की जनार्दनस्वामींमुळे नाथांना प्रत्यक्ष श्री दत्तात्रयांचे दर्शन झाले व त्यांच्याकडून नाथांना अनुग्रह देखील प्राप्त झाला. श्री गुरुदेवदत्त आरती मध्ये ते म्हणतात.
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान
हरपले मन झाले उन्मन
मी तू पंची झाली बोळवण
एकाजनार्दनी श्री दत्त ध्यान
नाथांनी त्यांच्या लेखनातही एका जनार्दनीं, तैसे जनीं आहे जनार्दन, जण नोहे अवघा हा जनार्दन, असे उल्लेख जनार्दन स्वामींविषयीची कृतज्ञता, जाणीव व्यक्त करण्यासाठी केले आहे. नाथांचे जीवनचरित्र हे प्रेममयच आहे. या प्रेमाला त्यांनी भक्तीची जोड दिली. त्यामुळे ती निखळ भक्ती हीच नाथांची ओळख झाली. गिरिजाबाईंशी त्यांचा विवाह व पुढे तीन अपत्यांची प्राप्ती. गंगा आणि गोदावरी ह्या मुली व हरी हा मुलगा पुढे नाथ कीर्तन करू लागले. जननिंदेला त्यांनी यशस्वी तोंड दिले. ते म्हणतात,
निंदक आमुची काशी।
आमुचे पातके नाशी ॥
नाथांच्या जीवनातील प्रसंग, चमत्कार हे सर्व काही त्यांची भक्ती व मानवासोबतच संपूर्ण प्राणिमात्रांप्रती असणारी भूतदया याची महती सांगणारीच आहे. म्हणून दगडाच्या नंदीने गवत खाणे हा चमत्कार सर्व निंदकांची तोंडे बंद करणारा आहे. रामेश्वरला काशीहून आणलेली गंगा कावडात असताना वाटेत तहानेने तडफडणाऱ्या गाढवाला पाजणारे नाथ, शेवटी रामेश्वराच्या स्वप्न दृष्टान्तातून पुन्हा काशीस येण्याची गरज नाही अशी आज्ञा मिळवतात. प्रेममय, करुणामय, भक्तिमय जीवन कसे असावे हे त्यांच्या जीवनपद्धतीतून त्यांनी दाखवून दिले.
नाथानी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार करण्याचे अलौकिक कार्य केले. “एकनाथी भागवत “हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ “भावार्थ रामायण” चे ४४ अध्याय लिहिल्या नंतर त्याचे वैकुंठगमन झाले. त्यानंतर त्यांचा शिष्य गावबा याने ते पुढे लिहून ग्रंथ पूर्ण केला. भागवत धर्माची पताका महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम आणि मग संपूर्ण देशात फडकली. सर्वानी विठ्ठल भक्ती, महिमा यांचे मार्गक्रमण करताना गुरु परंपरेला व गुरु दत्तात्रेयांना अग्रस्थान दिले आहे. संत एकनाथ महाराज म्हणतात,
आमुचे कुळीचे दैवत ।श्री गुरु दत्तमहाराज समर्थ ।
तोचि आमुचा मायबाप ।नाशी सकाळ संताप॥
सर्वच संप्रदायातून गुरु परंपरा सक्रिय आहे. प्रत्येक संप्रदायात गुरु दत्तात्रेयांना सद्गुरुंचे स्थान आहे. या बाबतीत कुठलाही भेद नाही. संत वाचनाने याची सिद्धता दिली आहे. ते वचन म्हणजे,
हरिहरा भेद। नका करू अनुवाद।
धरिता रे भेद । अधम तो जाणिजे ॥
त्यामुळे कुठलाही भेदभाव न ठेवता अनन्य भावाने श्रीनाथ याना शरण जाणे हाच बोध भक्तांनी घ्यावा. जेणेकरून सर्वच पारिवारिक आडचणींमधून सोडविल्याचे कार्य श्रीनाथ करतील. यासाठी त्यांनी सांगितल्या प्रमाणे दत्तनाम मुखी सदैव राहो. संत एकनाथ महाराजांनी म्हटल्या प्रमाणे,
हेचि आमुचे व्रत तप । मुखी दत्तनाम जप।
त्याविण सुटीका । नाही नाही आम्हा देखा ॥
म्हणून अन्यन्य भावाने दत्तनाम मुखी घ्यावे हाच बोध घ्यावा कुठल्याही भेदात, वादात न पडता भक्तीने मुक्ती कडे वाटचाल करूया एवढेच.
श्री गुरुदेव दत्त
जय जय राम कृष्ण हरी
प्रा. नितीन मटकरी
जळगाव
९३२६७७८३२९