अध्यात्म साधना व अध्यात्म ज्ञानाने परिपूर्ण ब्रम्हवादिनी मुक्ताई..!

0

मानव मात्रांना आत्मघातक व समाज विघातक आत्मविस्मृतीच्या अध:पतनातून किंकर्तव्यमुढ झालेल्यांना झगझगित प्रकाश मार्ग दाखविण्यासाठी संताचा जन्म होत असतो. संत अध्यात्म साधना व अध्यात्म ज्ञानाने परिपूर्ण असतात मुक्ताई देखील अशाच संत व ब्रम्हवादिनी होत्या. इ. स. १२०१ प्रभायिनाम संवत्सरावर दुर्गास्थापनेच्या दिवशी संत मुक्ताईंचा जन्म झाला. आज त्यानिमित्ताने ही लेखन सेवा ….!

श्रीमद भगवत गितेतील योग विभव भांडार या सहाव्या अध्यायातील श्‍लोक ३८ नुसार अर्जूनाच्या प्रश्‍नाला समाधानकारक उत्तर देतांना भगवान म्हणतात:- हे अर्जूना- इहलोकी अथवा परलोकी मुमुक्षु साधकाचा मध्येच मृत्यु झाला तर तो पुण्यात्मा पुण्यकर्माच्या जोरावर व पुण्याईने मिळालेल्या जन्माने स्वर्गादि लोकांपर्यंत पोहोचून पुण्यक्षम होत नाही तोपर्यंत स्वर्गसुख भोगतो आणि मग हा योगभ्रष्ट पुरुष पुन्हा त्याच्या संचितानुसार पवित्र कुळात जन्म घेतो. अशा प्रकारचा जन्म लोकी दुर्लभ आहे. अनायसेच पूर्वजन्माचे संस्कार व पुण्यसंचिताचा ठेवा प्राप्त असल्यामुळे तो अध्यात्मसाधनेस पूर्ण सिध्दी प्राप्त करण्यासाठी अग्रेसर होतो. शब्दब्रम्हापैल झेप घेण्याचे सामर्थ्य अशा साधकांस प्राप्त होते. पूर्व जन्मीचे संस्कार या चारही भावंडावर होतेच शिवाय त्यांचे वडिल विठ्ठलपंत व आई रुख्मिणीदेवी यांचे शुद्धत्व यामुळे ‘शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी’ या उक्तीनुरुप त्यांचा जन्म झाला. उपजतच विठ्ठलपंत सुशील, सात्वीक, विवेकशील, वैराग्यमूर्ती अध्यात्मज्ञानाने परिपूर्ण होते. सुखोपभोगांविषयी ते उदास होते.

आळंदी या छोटया पण पुरातन गावी चौघा भावंडाचा जन्म झाला. स्कंद पुराणात आळंदीचं वर्णन येतं ते असं.-

कृतेच आनंद विपीन, त्रेताया वारुणं स्मृत ।
व्दापरे कपिलं शेयं, अलंकाररण्या कलैयुगै ॥

कृतयुगात आनंदवन, त्रेतायुगात वारुण, व्दापर युगात कपील आणि कलीयुगी अलकावती अलंकापुरी आळंदी. अशा नावांनी हे क्षेत्र उल्लेखित आहे. श्री ज्ञानदेव मुक्ताईही अध्यात्मयोग संपन्न भावंडांचा जन्म अशा स्थळी व्हावा हे त्यांच्या चारित्र्याशी ज्ञानयज्ञमय जीवनाशी सुसंगत ठरते.

ज्ञान, वैराग्य, भक्तिची बाळघुटी बालपणी पाजली. म्हणून चौघे भावंड दैदिप्यमान चारित्र्यसंपन्न निपजले. परमोच्च ज्ञानाअधिकार संपन्न, परमतत्वस्पर्श, काव्यसंपदेत मुक्ताईची अभंगवाणी तीच्या अंगभूत आगळेपणाने स्वयंभू तेजाने लखलखती तडपती होती.

एका रुपाच्या चटवार दिपिका ।
उजळल्या या का मूर्तीमंत ॥
एकात तेजाचिया । येका सत्वाचिया ॥
एकेची लावण्ये । येकेचि प्रकाशे ।
एकेची उल्हासे । वर्तताती ॥

चौघांपैकी कुणाचाही जीवनपट चरित्रपट उलगडून दाखवायचा असेल तर अपरिहार्यपणे चौघांचे जिवितपट आपोआप पुढे येते. निर्दय समाजाने कठोर नितीने हया चौघाही भावंडांच्या झोळीत टाकलेल्या असहय वेदनांचे, अपमानांचे, अपक्षेचे, हेटाळणीचे दान पचवून बंधुत्वाच्या पायावर उभ्या असलेल्या भिंती मजबूत केल्या म्हणून निर्जीव भिंतही ज्ञानदेवांच्या आज्ञेने चालली. कसलाही त्रागा, कुरकुर व परस्परांवर मात करण्याची इच्छा कधीच मोकळी सोडली नाही. शुध्दीपत्राच्या निमित्ताने पैठण ते नेवासे या यात्रेत भगवत भजन किर्तन लोकोध्दाराची तळमळ रसरशीतपणे पुढे आली.

पैठण वासीयांनी या चौघा भावंडामधलं असामान्य अध्यात्म कर्तृत्व ओळखलं ‘आत्मवत सर्व भुतेषु’ हया दृष्टीकोनातून त्यावेळी प्रौढता प्रगल्भता व परिपक्वता आली. सोशिकता संयम जबाबदारीची जाणीव कर्तव्यपरायणता यामुळे मुक्ताईचे व्यक्तिमत्व अधिक ज्ञानसंपन्न विवेक संपन्न विलोभनीय बनले. मुक्ताईचे स्थान व अधिकार लहान असल्याने अधिक लाडाकौतुकाचे ठरले.

मुक्ताईची अभंगवाणी फार मोठी नाही. परंतू जी आहे त्यात शोध बोध व आत्मबोध आहे.

मुक्ताई पूर्णत: मुक्तता साधली ।
मुक्ताई जीवन मुक्ताचि सर्वदा ।

अंर्तबाहय आत्मानंदी रंगून गेलेल्या या ब्रम्हवादिनीचे ज्ञानविश्‍व मोठे होते. अध्यात्मज्ञान हे मुक्ताईचे जीवनसार होते. प्रखर ज्ञानतेजामुळे फटकळ, परखड, धीट बनली असा अधिकार तिनं प्राप्त केला होता. संत शिरोमणी भक्तराज नामदेवांचा असो वा चौदाशे वर्षे वयोवृध्द चांगदेवांचा दंभ उतरविण्यासाठी कर्मकांडी विसोबा खेचरांच्या मनबुध्दीवरील धुळ झटकण्यासाठी असो आणखीन ज्ञानदेवांच्या विषाद पटलाला दूर करुन या लहाणग्या मुक्ताईचे ज्ञातेपण सिध्द झाले.

गुरुची गुरुमाऊली बनून विश्‍वतारक मंत्र देतांना लळिवाडपणे मुक्ताईने ज्ञानघनतेने लखलखत विश्‍वकल्याणमयी अमृतवाणीने ताटीचे अभंग लिहिले. संतमनाची विश्‍वकरुणामय ज्ञानदिवली, वात्सल्याने खळीळती अमृतधारा मराठी साहित्यतच नव्हे तर संपूर्ण साहित्यविश्‍वात ज्यांना तोड नाही असे ताटीचे अभंग म्हणजे योगवाणीचा पूर्णोद्गारच ….!

योगी पावन मनाचा । साहे अपराध जनाचा ॥
विश्‍व रागे झाले वन्ही । संती सुखे व्हावे पाणी ॥
शब्द शस्त्रे झाले क्लेश ।संती मानावा उपदेश ॥
विश्‍व पट ब्रम्ह दोरा । ताटी उघडा ज्ञानेश्‍वरा ॥

ज्ञानाई, ज्ञानदेवा, ज्ञानोबा आपण संत आहोत विश्‍व रागावले तरी आपण पाण्यासारखे शांत शीतल होऊन तो अग्नी अधिक भडकणार नाही असे आपल्याला करावे लागेल. अहो दादा, तुम्ही लौकिक सुख दु:खातीत अशा ‘ब्रम्हसुखात’ रममाण असतात. ब्राम्हण-चांडाळ, दुष्ट सुष्ट, माती- सोने या सर्वांविषयी समत्वबुध्दी असलेले तुम्ही ज्ञानयोगी म्हणून सर्वांना ब्रम्हस्वरुप मानून जपले पाहिजे मुळ ऐक्यच आहे. म्हणून ब्रम्ह जैसे तैशापरी। आम्हा वडिल भूते सारी॥ आपलाच हात आपल्याला लागला तर आपण तो तोडून टाकावा का ? आपली जीभ दातांखाली चावली जाते. मग आपण दात उपटून फेकू का ? अशा शुद्ध तात्वीक सिध्दांतांनी ज्ञानदेवांचा विषाद दूर सारण्याचा प्रयत्न केला. मोठे भाऊ रागावले व त्यांनी स्वत:ला कोंडून घेतले तेव्हा मुक्ताईने बऱ्याच वेळ ज्ञानदेव बाहेर येत नाहीत हे पाहून कठोर शब्दात म्हणाल्या – वेळे क्रोधाचा उगवला । अवघा योग फोल झाला ॥ अहो दादा, आपले वडिल बंधू श्रीनिवृत्ती दादांकडून आपल्याला जो योगाचा ठेवा प्राप्त झाला तो क्रोधाच्या उगवण्यामुळे वाया गेला म्हणायचे का ? कारण क्रोध हा दंभ, मद, मोह, मत्सर हया आसुरी संपत्तीचा जनक असून अध्यात्म मार्गातील मोठा अडसर आहे. म्हणून आपण गुंफेत दार बंद करुन बसला तरी हृदयात क्षोभ असतांना चित्ताची शांती कशी बरी लाभेल ? ताटीच्या अभंगातून मुक्ताईने मराठी मनांमध्ये स्वानुभव संपन्न रसरशीत तेज ओतले आहे.

मुक्ताई स्वस्वरुपात तल्लीन सदगुरु निवृत्तीनाथांच्या ठायी अनन्यत्वाने लीन संपूर्णत: उदासीन निर्लिप्त, निर्विकार झाली होती. ज्ञानोबांनी आळंदीत समाधी घेतली. सोपानदेवांनी सासवडमध्ये तर निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्‍वरला समाधी घेण्याचा विचार मांडला. समाधी सोहळयाची घग अंतर्मनाच्या गाभाऱ्यात मुक्ताईला अस्वस्थ करीत होती. संत मेळा महाराष्ट्रभर भ्रमंती करीत वैशाख वद्य दशमीच्या दिवशीच्या शके १२१९ तापी नदीच्या तीरावर खान्देशातील मेहुण येथे आला. उपवासाने शरीर क्षीण झाले होते. १८ वर्षाच्या मुक्ताईला चालणेही जड जात होते. निवृत्तीनाथांनी हात घट्ट धरुन सावध ममताळुपणे आपल्या लाडक्या बहिणीला सांभाळले.

तापी तिरावर मेहुणगांवी वैशाख वद्य १० शके १२१९ या दिवशी मध्यान्ही १२ वाजेचे सुमारास सर्व संतमेळा स्नान करीत असतांना आकाशात अचानक काळयाकुट्ट मेघांनी गर्दी केली. सोसाटयाचा वारा सुटला धुळ उडाली विजांचा कडकडाट सुरु झाले. कानठळया बसू लागल्या. सर्व संतमेळा भयभित झाला आणि एकच हलकल्लोळ उठला. तोच डोळे दीपवून टाकणारा विजेचा प्रचंड लखलखाट झाला. महाप्रलय येतोय की काय ? असे वाटले असतांना कुणाची शुद्ध कुणास उरली नाही हा सर्व गोंधळ सुरु असतांना निवृत्ती नाथांच्या हातून नकळत मुक्ताईचा हात सुटला… सावरा… सावरा… धरा अशी आर्त हाक निवृत्तीनाथांनी फोडली त्याच क्षणी …

कडाडली विज निरंजनी जेव्हा ।
झाली गुप्त तेव्हा मुक्ताबाई ॥

केवळ १९ वर्षाच्या या निरंजनीने जगाचा निरोप घेतला. तापी तिरावर मेहुणगांवी योगेश्‍वर महादेवाच्या मंदिरा शेजारी मुक्ताई सदेह गुप्त झाली.. तिरोभावीत झाली..! आजही या ठिकाणी हजारो भावीक पायी दिंडीने नाचत गात येतात. मुक्ताईचे दर्शन घेतात. खान्देशच्या वैभवात मुक्ताईच्या पदस्पर्शाने भर पडली आहे. दरवर्षी मानाची पालखी इथूनच पंढरपूरला जाते. शेकडो वर्षांची ही परंपरा आजतागायत सुरु आहे.

रमेश जे. पाटील
आडगाव ता. चोपडा
9850986100

Leave A Reply

Your email address will not be published.