रुग्णवाहिका चालकांच्या पगारात स्थानिक प्रशासनाचा खोडा!
चालकांचे संपूर्ण वेतन देय : सरिता हजारे यांची माहिती
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जिल्ह्यातील 185 हेडखालील 102 रुग्णवाहिका चालक गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांवर, उपजिल्हा रुग्णालयांमध्ये आणि जिल्हा रुग्णालयात सेवा देत असून त्यांचे वेतन गेल्या अनेक दिवसांपासून रखडले आहे. पुणे आरोग्य आयुक्तालयाकडून या चालकांचे वेतन अदा करण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या अनागोंदी कारभारामुळे चालक वेतनापासून वंचित आहे. स्थानिक प्रशासन डाटा गोळा करण्याच्या नावाखाली चालढकल करीत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील अपघातग्रस्त रुग्ण, गरोदर माता, गंभीर आजारी व्यक्ती यांना वेळेत उपचार मिळावे यासाठी हे चालक रात्रंदिवस रुग्णसेवेत व्यस्त असतात. परंतु एवढी महत्त्वाची सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगारच मिळत नसल्याने संतापाची लाट उसळली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडून चालकांचा डेटा व अकाउंट नंबर सेव करण्याचे काम सुरू असून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वेतन दिले जाईल असे सांगितले जात असलले तरी त्यात केवळ चालढकल होत असून चालक हक्काच्या वेतनापासून वंचित राहत आहेत.
‘‘ जळगाव जिल्ह्यातील 102 रुग्णवाहिका चालकांचे वेतन आमच्याकडून जिल्हा प्रशासनाकडे अदा करण्यात आले आहे. स्थानिक पातळीवर त्यांना काय अडचण आहे हे सांगता येत नाही. कुणाचेही वेतन आमच्याकडे थकीत नाही. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून माहिती घेवून पगार अदा करण्याची सूचना देण्यात येईल.”
– सरिता हजारे,
उपसंचालक, आरोग्य विभाग पुणे