लोकशाही न्यूज नेटवर्क

मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द गावात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत पवन दामोदर चिखलकर यांची शेतसंपत्ती मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली आहे. या आगीत त्यांच्या शेतातील शेणखत, पीक आणि पशूंचा मोठा बळी गेला असून, परिसरात भयाक्रांत वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गावाजवळील शेतात डीपीजवळ शेणखत साठवले होते. अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने काही क्षणांत ही आग प्रचंड स्वरूप धारण केली. यामुळे पवन दामोदर चिखलकर यांचे दहा बकऱ्या तसेच चार-पाच बकऱ्यांची पिल्ले जळून मरण पावली. याशिवाय गहू, ज्वारीसह शेतीसाठी लागणारे ठिबक सिंचन साहित्य आणि इतर महत्त्वाचे शेती साहित्यही जळून खाक झाले.
घटनेची माहिती मिळताच बोदवड येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझविण्यासाठी तातडीने प्रयत्न केले. पोलीस प्रशासनही घटनास्थळी पोहचले आणि गावकऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. नागरिकांनी घरोघरी पाणी उभारून आग नियंत्रणात आणण्यास मदत केली.
ग्रामस्थांनी शेतकऱ्याच्या मोठ्या आर्थिक नुकसानाबद्दल चिंता व्यक्त केली असून, नुकसान पंचनाम्याद्वारे तातडीने शासकीय मदत देण्याची मागणी केली आहे. स्थानिक प्रशासनाने देखील या घटनेची दखल घेत मदतीसाठी त्वरित पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.


