लियोनेल मेस्सीच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवाचं उद्घाटन

फुटबॉलचा जादूगार क्रिकेटच्या पंढरीत : चाहत्यांकडून जल्लोष

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

अर्जेंटिनाला आपल्या नेतृत्वात वर्ल्ड कप जिंकून देणारा दिग्गज आणि स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी हा 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहे. मेस्सीने भारत दौऱ्याची सुरुवात कोलकातातून केली. मेस्सीने कोलकातात आपल्या पुतळ्याचं व्हर्च्युअल उद्घाटन केलं. त्यानंतर आता मेस्सी भारत दौऱ्यातील दुसऱ्या दिवशी मुंबई दौऱ्यावर आहे. मेस्सीचं मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये चाहत्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आलं आहे. मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी फुटबॉल चाहत्यांनी स्टेडियममध्ये आणि आसपासच्या परिसरात तोबा गर्दी केली आहे. तसेच स्वागतानंतर लिओनेल मेस्सी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवाचं उद्घाटन करण्यात आलं आहे.

मेस्सीची चाहते गेल्या तासाभरापासून वाट पाहत होते. मेस्सीची जवळपास 6 वाजता वानखेडे स्टेडियममध्ये एन्ट्री झाली. फुटबॉलचा देव क्रिकेटच्या पंढरीत येताच चाहत्यांनी मेस्सी मेस्सी, असा जयघोष करत स्टेडियम दणाणून सोडला. त्यानंतर मेस्सी आणि टीम इंडियाचा दिग्गज फुटबॉलर सुनील छेत्री यांनी एकमेकांची भेट घेतली. मेस्सी आणि सुनील या दोघांनी एकमेकांना मिठी मारली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेस्सी याला सन्मानित केलं. मुख्यमंत्र्यांनी यावेळेस मेस्सीला स्मृतीचिन्ह दिलं. तसेच यावेळेस फुटबॉलला चालना देण्यासाठी राज्य सरकारच्या ‘प्रोजेक्ट महादेवा’चं मेस्सीच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलं आहे.  मेस्सी आणि फडणवीस यांनी बटन दाबून प्रोजेक्ट महादेवाचं उद्घाटन केलं. त्याआधी मेस्सीने 60 खेळाडूंना स्कॉलरशीप दिली. प्रोजेक्ट महादेवा अंतर्गत 60 गुणवंत खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या प्रोजेक्ट महादेवाअंतर्गत निवड करण्यात आलेल्या 13 वर्षांखालील फुटबॉलपटूंना मेस्सीसोबत फुटबॉलचं प्रशिक्षण मिळालं. तसेच मेस्सीने या खेळाडूंना मार्गदर्शन केलं.

दरम्यान अवघ्या जगाच्या पाठीवर फुटबॉलपटूच्या गळ्यातील ताईत असलेला लिओनेल मेस्सी भारत दौऱ्यावर आहे. तब्बल 14 वर्षांनी भारतात आल्यानंतर कोलकातामध्ये अभूतपूर्व राडा झाला, पण हैदराबादमध्ये दिमाखात स्वागत झाले. कोलकात्यातील त्याचा अनुभव फारसा चांगला नव्हता. साल्ट लेक स्टेडियममधील गोंधळामुळे त्याने फक्त 22 मिनिटांत स्टेडियम सोडले. हैदराबादमध्ये त्याने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासोबत फुटबॉल खेळत आणि मुलांसोबत मजा केली. यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सुद्धा उपस्थित होते. दोघांमध्ये चर्चा होताना सुद्धा दिसून आली. मेस्सीने अर्जेटिनाची जर्सी राहुल यांना भेट दिली. ज्याचे फोटो राहुल गांधींनी स्वतः त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. लुईस सुआरेझ आणि रॉड्रिगो डी पॉल यांनीही हैदराबादमध्ये मेस्सीसोबत आनंद द्गिगुणित केला.

मेस्सी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर थोडा उशिरा पोहोचला, परंतु त्याने कॅमेऱ्याकडे पाहिले आणि चाहत्यांचे अभिनंदन स्वीकारताच प्रेक्षकांमध्ये आनंदाची लाट उसळली. तिन्ही फुटबॉलपटूंनी मुलांसोबत खूप मजा केली. फुटबॉल सामन्यादरम्यान मेस्सी, सुआरेझ, डी पॉल आणि रेड्डी यांच्या कौशल्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. हैदराबादला निरोप देताना मेस्सीने आयोजकांना अर्जेंटिना फुटबॉल जर्सी भेट दिली. स्पॅनिश भाषेत चाहत्यांचे आभारही मानले.

काय आहे ‘प्रोजेक्ट महादेवा’?

क्रिकेटवेड्या भारतात फुटबॉलला चालना देण्यासाठी आणि फुटबॉलच्या विकासासाठी राज्य सरकारकडून ‘प्रोजेक्ट महादेवा’ राबवण्यात आलं आहे. या प्रोजेक्ट महादेवाअंतर्गत निवड करण्यात आलेल्या 60 खेळाडूंना फुटबॉलचे तंत्रशुद्ध धडे देण्यात येणार आहेत. त्यामुळे या 60 खेळाडूंसाठी ही ऐतिहासिक अशी संधी असणार आहे. यातून उद्याचे खेळाडू घडतील तसेच भारताची फुटबॉलमधील कामगिरी आणखी सुधारेल, असा विश्वास सरकारला आहे.

 

दोन खेळाचे देव एकत्र

दरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मेस्सीचं जोरदार स्वागत करण्यात आले. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने त्याची टीम इंडियाची जर्सी फुटबॉलचा देव लिओनेल मेस्सीला भेट दिली. त्यावर सचिनची स्वाक्षरी होती. मेस्सी आणि सचिन यांनी एकत्र फोटो काढला. हा एक ऐतिहासिक क्षण होता. मुंबईत मेस्सीच्या सर्व कार्यक्रमांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.