जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने उत्तर महाराष्ट्रातील हवामानात बदल होण्याची शक्यता असून, जळगाव जिल्ह्यात २६ ते ३१ जुलैदरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही तुरळक भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान अभ्यासक निलेश गोरे (जळगाव वेदर) यांनी दिली आहे.
हवामान खात्याच्या परिस्थितीनुसार वातावरणात ओलाव्याचे प्रमाण वाढत असून, जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये अल्पावधीत जोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्येही २६ ते ३१ जुलै या कालावधीत पावसाची शक्यता आहे. मात्र, या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर तुलनेने कमी राहण्याची शक्यता असून, बहुतांश ठिकाणी तुरळक ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. अधूनमधून काही भागांत मध्यम स्वरूपाच्या सरींची नोंद होऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सध्या सुरू असलेल्या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळत असला, तरी काही ठिकाणी जोरदार पाऊस झाल्यास शेतकऱ्यांनी पिकांची तसेच शेतीतील कामांची योग्य काळजी घ्यावी, असेही आवाहन करण्यात येत आहे. हवामानातील बदल लक्षात घेऊन नागरिकांनी अद्ययावत हवामान अंदाजावर लक्ष ठेवावे आणि आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन हवामान अभ्यासक निलेश गोरे यांनी केले आहे.


