लोकशाही न्यूज नेटवर्क
भारतातील सर्वात आनंददायी आणि प्रकाशाचा सण म्हणजे दिवाळी. अर्थात दीपावली… प्रकाशाचा अंधारावर विजय आणि वाईटावर चांगुलपणाची मात म्हणून दिवाळी उत्सव साजरा केला जातो.. भारतात हिंदूंचे जे काही सण साजरे केले जातात, त्यात दिवाळी सणाला अनन्य साधारण असे महत्त्व आहे.. त्यामुळे दिवाळी सणाला सणांचा राजा म्हणूनही संबोधले जाते. पाच दिवस चालणाऱ्या या दिवाळी सणाच्या प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे महत्त्व आहे. यंदा शनिवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी पहिला दिवस वसुबारस आणि धनत्रयोदशी. धन्वंतरी देवीची पूजा करून उत्तम आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना केली जाते. रविवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी. प्रभातकाळी अंगाला सुगंधी तेल, उठणे लावून अभ्यंग स्नान केले जाते. नरक चतुर्दशी नंतर 21 आणि 22 ला लक्ष्मीपूजन. हा दिवाळीच्या पाच दिवसांच्या पर्वातील महत्त्वाचा दिवस. या दिवशी घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी व्यापाऱ्यांपासून ते मध्यमवर्गीय तसेच सर्वसामान्यांपर्यंत सर्व घरात लक्ष्मीच्या मूर्तीची पूजा करून प्रार्थना करतात. सर्वत्र दिवे, आकाश कंदील लावून नवीन कपडे परिधान करून फटाके फोडून आनंद उत्सव साजरा करण्यात येतो.
अलीकडे देशातील पर्यावरण दूषित झाल्यामुळे पर्यावरण पूरक फटाके फोडावेत, तसेच कमीत कमी फटाके फोडून चांगले पर्यावरण राखण्यासाठी प्रयत्न होणे गरज आहे. ही अत्यंत आवश्यक बाब बनली आहे. गोडधोड पदार्थ खाण्याचा आनंद सर्वत्र साजरा केला जातो. चौथा दिवस म्हणजे पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा. या दिवशी पतीचे आयुष्य निरोगी दीर्घायुष्य राहण्यासाठी पत्नी पतीला ओवाळते आणि दिवाळीचा पाचवा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज या दिवशी प्रत्येक बहिणी आपल्या भावाला ओवाळून चांगले जीवन प्राप्त व्हावे याबाबत बहिणींकडून प्रार्थना केली जाते. अशाप्रकारे पाच दिवस चालणाऱ्या या दिवाळी उत्सवाचा आनंद सर्वत्र आनंदाने लुटला जातो. श्रीमंत आणि गरीब हे सर्व भेदभाव विसरून दिवाळीचा आनंद घेतात. प्रत्येक कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन आनंदाचा उपभोग घेतात, म्हणूनच इतर सणांपेक्षा दिवाळी सणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
यंदा कधी नव्हे तितका महाराष्ट्रात पाऊस झाला. पाऊस म्हणजे इतका की अतिवृष्टीने संपूर्ण महाराष्ट्राला जेरीस आणले. विशेष म्हणजे गेल्या 70-80 वर्षात महाराष्ट्रात झाला नव्हता तितका अतिवृष्टीचा पाऊस महाराष्ट्रात यंदा झाला. महाराष्ट्रात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकण आदी भागात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांची संपूर्ण पिके पाण्यात गेली. पिके तर गेलीच पण अनेक ठिकाणी संपूर्ण जमीन देखील खरडून वाहून गेली. जमीन वाहून गेलेल्या ठिकाणी पुढच्या वर्षी शेतकऱ्यांना शेती करून पिके घेणे पूर्ण अशक्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण कंबरडे मोडले आहे. दिवाळी सणाच्या आधी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल्याने तो बेचिराख झाला आहे. पिके आणि जमिनीबरोबरच जनावरे देखील वाहून गेली. घरात पाणी शिरल्याने घरातील किडूक मिडूक वाहून गेले. घराबाहेर कोठेतरी आसरा घेऊन त्यांना राहावे लागते आहे. इतरांच्या सहकार्याने तसेच शासनाच्या मदतीने दोन वेळेचे जेवण त्यांना मिळाले. त्यामुळे यंदा दिवाळीचा सण त्यांच्यासाठी आनंददायी नव्हे, तर दुःखाने भरलेला आहे.
सर्व शेतकरी कुटुंब हवालदिल झाले आहेत. त्यांच्या दुःखात आपण महाराष्ट्रातील सर्व सहभागी होऊन दिवाळी सणात आनंद देण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यांच्या जीवनात पसरलेल्या दुःखाच्या अंधारात आनंदाचा थोडा बहुत प्रकाश आणण्याचा आपण प्रयत्न करूया, तसे झाले तर त्यांना सर्वांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या असे म्हणता येईल. त्यांच्यावर पसरलेल्या दुःखाचा डोंगर इतका मोठा आहे, की आपण कितीही मदत व सहकार्य करण्याचा प्रयत्न केला तरी तो तोकडाच राहणार आहे. फुल न फुलाची पाकळी म्हणून सर्वांनी थोडीशी मदत जरी केली, तर फार मोठे सहकार्य होईल. शासन शासनाच्या परीने मदत करते आहे. शासनाकडून मदतीची फार मोठी अपेक्षा आहे. तथापि शासनाच्या मदतीवरून विरोधी पक्षात आणि शेतकऱ्यांमध्ये अनेक प्रकारचे वाद प्रतिवाद चालू आहेत. शासनाचे मदतीचे कार्य जर योग्य रीतीने झाले तर मोडलेल्या शेतकर्याला उभे राहण्यासंदर्भात आधार मिळेल. मोडलेला शेतकरी पुन्हा उभा राहावा, याच दिवाळीच्या शुभेच्छा आपण देऊया. आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनात दिवाळीचा प्रकाश आणूया! दिवाळी या प्रकाशाच्या सणाच्या दैनिक लोकशाहीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा..!