दहेगाव जंगल परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

भंडारा : दहेगाव जंगल परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू. जंगल परिसरात जलाऊ इंधन (सरपण) गोळा करण्यासाठी गेलेल्या एकावर बिबट्याने हल्ला चढवत ठार केल्याची घटना घडली. ही घटना आज २७ जानेवारी रोजी सकाळी ७ च्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील दहेगाव जंगल परिसरात घडली.

प्रमोद चौधरी (वय ५५, रा. लाखांदूर) असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दहेगाव जंगल परिसरात बिबट्यासह अन्य वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतांना देखील परिसरातील नागरिक नियमित जंगल परिसरात जलाऊ इंधन गोळा करण्यासाठी जात असल्याची माहिती आहे.

आज सकाळी प्रमोद गावातील काही साथीदारांसह दहेगाव जंगल परिसरांत जलाऊ इंधन गोळा करण्यासाठी गेला होता. यावेळी शिकारिच्या शोधात दबा धरुन बसलेल्या बिबट्याला सकाळच्या सुमारास जंगल क्षेत्रात काही नागरिक आढळून येताच त्याने हल्ला चढविला.

बिबट्याने प्रमोदला तब्बल १०० मीटरपर्यंत घनदाट जंगलात फरफटत ओढत नेऊन ठार केले. प्रमोदच्या साथीदारांनी कुटुंबियांसह गावकरी व वनविभागाला याबाबत माहिती दिली. स्थानिक लाखांदूर वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी रुपेश गावित, वनरक्षक एस जी खंडागळे, जी डी हत्ते, प्रफुल राऊतसह अन्य वनकर्मचारी व गावकऱ्यांनी घटनास्थळ गाठले. यावेळी वनकर्मचाऱ्यांनी बिबट्याच्या हल्ल्याप्रकरणी घटनास्थळासह मृतदेहाचा पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.

या घटनेची पोलीस विभागाने देखील नोंद केली आहे. तर, शासनाने बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या प्रमोदच्या कुटुंबियांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here