‘लेक लाडकी’ योजनेच्या ५ हजार लाभार्थींना अडीच कोटींचा निधी वितरित

0

‘लेक लाडकी’ योजनेच्या ५ हजार लाभार्थींना अडीच कोटींचा निधी वितरित

जळगाव प्रतिनिधी

जिल्ह्यातील ‘लेक लाडकी’ योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला जात असून, आतापर्यंत ५ हजार लाभार्थी मुलींच्या खात्यात एकूण २ कोटी ५० लाख २० हजार रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे प्राप्त अर्जांची छाननी झाल्यानंतर हा निधी वितरित करण्यात आला.

१८ वर्षांपर्यंत विविध टप्प्यांत मिळणार आर्थिक मदत

१ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींना आणि दोन मुलींपर्यंतच्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मुलींच्या शैक्षणिक टप्प्यांनुसार वित्तीय मदत दिली जाते:

जन्मानंतर: ५,००० रुपये

इयत्ता पहिली: ७,००० रुपये

इयत्ता सहावी: ७,००० रुपये

इयत्ता अकरावी: ८,००० रुपये

१८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर: ७५,००० रुपये

सध्या १ लाख १ हजार मुलींची नोंदणी करण्यात आली असून, आतापर्यंत ५ हजारांहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान वितरित करण्यात आले आहे. २,६४२ नवीन अर्जांची छाननी सुरू असून, त्यातील अडीच हजार लाभार्थ्यांच्या खात्यात येत्या आठवड्यात १ कोटींचा निधी वर्ग केला जाणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी रहिवासी रेशन कार्ड, लाभार्थी मुलीचा जन्म दाखला, आधार कार्ड, आई व मुलीचे संयुक्त बँक खाते आणि कुटुंब नियोजनाची अट पूर्ण केल्याचा पुरावा आवश्यक आहे. योग्य कागदपत्रांसह जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागात अर्ज सादर केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना अनुदान वितरित केले जाते.

“लेक लाडकी योजनेला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दोन वर्षांतच ५ हजारांहून अधिक मुलींना या योजनेचा लाभ मिळाला आहे. आणखी अर्ज प्रलंबित असून, पात्र लाभार्थ्यांना लवकरच निधी वितरित करण्यात येईल.”
– हेमंत भदाणे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग, जळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.