लोकशाही संपादकीय लेख

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून विधान परिषदेच्या एका जागेसाठी महायुती मधील भाजप व शिवसेना यांच्यात चांगलीच रस्सीखेच सुरू झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांचा मुलगा प्रताप पाटील याच्यासाठी आग्रह धरला आहे. ते म्हणतात, भाजप हा मोठा भाऊ असून त्यांनी यावेळी ही जागा शिवसेनेला सोडावी अशी आग्रहाची विनंती त्यांनी केली आहे. प्रताप पाटील हा जिल्हा परिषद सदस्य राहिला आहे. त्याला अनुभव आहे. ग्रामीण भागाची भागातील जनतेशी त्याचा चांगला संवाद आहे. त्यासाठी ही जागा शिवसेनेला द्यावी असा आमचा आग्रह आहे. विधानपरिषदेच्या जागेवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यासाठी ही जागा शिवसेनेला द्यावी अशी आमची मागणी आहे. शेवटी महायुतीच्या अधीन राहून भाजप किंवा शिवसेना कोणालाही जागा मिळाली तरी वरिष्ठ पातळी वर जो निर्णय घेतला जाईल, त्या निर्णयाचे पालन केले जाईल, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे म्हणणे आहे. निवडणुकीत जागा मागणे ही काही चुकीची बाब आहे असे नाही. जागेसाठी आग्रह असणे हे काही चुकीचे नाही. तिकडे भाजपकडे मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर येथील निवासस्थानावर आमदार व खासदारांची गुप्त बैठक झाली. त्या बैठकीत गेल्या अनेक वर्षापासून जळगावची जागा भाजपकडे आहे. त्यानुसार आता ही जागा भाजपलाच मिळावी अशी मागणी लावून धरल्याचे वृत्त आहे. याप्रसंगी बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, गेल्या 25 वर्षापासून ही जागा भाजपकडे आहे. त्यामुळे भाजपला ही जागा मिळाली पाहिजे, असा आमचा आग्रह राहील. आमच्याकडे उमेदवारांचा तुटवडा नाही. जागा एक आणि त्यावर हक्क सांगणारे 10 जण आहेत. अजून आमचा उमेदवार ठरलेला नाही. परंतु ही जागा भाजपलाच मिळावी असा आमचा आग्रह आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन या दोघांमध्ये अशी रस्सीखेच सुरू आहे. त्यात ही जागा पदरात पाडून घेण्यासाठी भाजप की शिवसेना कोण यशस्वी होतो? हे पाहायचे आहे. वरिष्ठ पातळीवरील महाराष्ट्रातील 17 विधान परिषदेच्या जागेवर महायुतीचे 12 भाजप, 4 शिंदे शिवसेना आणि 1 राष्ट्रवादी काँग्रेस असा फॉर्म्युला ठरला असल्याचे वृत्त आहे. आता या फॉर्मुलानुसार जळगावची जागा भाजपकडे जाते. त्यामुळे फॉर्म्युलाचा विचार केला तर ही जागा भाजपला जाते. त्याऐवजी शिवसेना युती धर्माचे पालन करेल. युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मतही निर्णय ठरतील. एकंदरीत भाजप अथवा सेना यापैकी कुणाला ही जागा जाते? त्यावर सर्व काही अवलंबून आहे. शेवटी संख्या बळावर भाजप ही जागा स्वतःकडे घेण्याची दाट शक्यता आहे.
भाजप किंवा शिवसेना महायुतीची उमेदवारी मिळाल्यानंतर विरोधकांकडे काय हालचाली सुरू आहे? याचा अंदाज घेतला तर महाविकास आघाडीतून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार शरद तायडे यांना उमेदवारी घोषित करण्याची दाट शक्यता आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार महायुती समोर टिकाऊ धरू शकणार नाही. परंतु महाविकास आघाडीतर्फे उमेदवार घेण्याचा निर्णय झाला आहे, असे कळते. महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस हे पक्ष येतात. त्यांच्या गटाचे हे प्रतिनिधित्व असेल. दुसरीकडे अपक्ष उमेदवार म्हणून भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी हे मैदानात उतरणार असल्याचे कळते. त्यांनी नुकतीच एक बैठक भुसावळमध्ये घेतली असल्याचे देखील कळते. या बैठकीला 109 नगरसेवक उपस्थित असल्याचे सांगण्यात येते. अनिल चौधरी अपक्ष म्हणून जो गाजावाजा करत आहेत, त्यामागे वेगळेच हितसंबंध दडले असल्याची समजते. 109 नगरसेवक असो वा नसो.. परंतु दबाव यंत्र टाकण्याचा त्यांचा हेतू क्लिअर आहे. या विधान परिषदेत निवडणुकीसाठी त्यांची फार मोठी कसरत होते आहे. घोडेबाजाराला वाव मिळणार आहे. मागील विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे पटेल यांचा एकमेव अर्ज असताना ती निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत असतानाच एडवोकेट विजय पाटील यांनी आपली अपक्ष उमेदवारी जाहीर केली आणि ‘मी लढणारच माघार घेणार नाही’ म्हणून ते हट्टाला पेटले आणि त्यावेळी ती निवडणूक बिनविरोध झाली नाही. प्रत्येक नगरसेवक जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य यांचा भाव मात्र वधारला हे खरे आहे. अशा प्रकारे ती निवडणूक बिनविरोध होण्याऐवजी जी निवडणूक पार पडली त्यात विजय पाटलांचा मोठ्या फरकाने पराभव झाला, पण निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची नाही हा त्यांचा हट्ट नडला. अशाच प्रकारे भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी दंड थोपटले आहे. त्यात त्यांना कितपत यश येईल, हे सांगता येणार नाही. पण निवडणूक लढवावी अशी घोषणा करून आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न आहे, असे म्हणायला हरकत नाही. 109 नगरसेवक यांनी कसे काय बैठकीला आणले हे कळायला मार्ग नाही. एकंदरीत विधान परिषदेची ही निवडणूक बिनविरोध होण्याऐवजी निवडणूक पार पडेल असेच चित्र दिसते आहे. या विधानपरिषद निवडणुकीत ज्या नगरपालिका निवडून आले आहेत. त्यामध्ये भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार सर्वाधिक आहेत. जळगाव महानगरपालिकेत तर 75 जागांपैकी 69 जागा या भाजप व शिवसेनेच्या आहेत. त्यामुळे मतदार संख्या पाहता महायुतीच्या उमेदवार येथे सहज बाजी मारू शकतो. जर यदाकदाचित महायुतीमध्ये फूट पडली, तर शिवसेनेपेक्षा भाजपची मतदार संख्या सर्वाधिक असून त्या जागेवर भाजप बाजी मारू शकतो. आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झाली. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख येईपर्यंत किती आणि कोण अर्ज दाखल करतात हे पहायचे आहे. अंतिम माघारी नंतर माघारीच्या दिवशी सर्व चित्र स्पष्ट होईल. दरम्यानच्या काळात भाजप आणि त्यांच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू राहील असे दिसते..!


