लोकशाही न्यूज नेटवर्क
प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचे सोमवारी वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले. त्यांना अशा एका आजाराने ग्रासलं होतं ज्यावर शक्यतो कोणताच उपचार नाहीये. अशाच आजाराने झाकीर हुसैन यांचा जीव घेतल्याचं त्यांच्या कुटुंबाने सांगितले.
प्राथमिक अहवालानुसार त्यांना हृदयाशी संबंधित समस्या होती. त्यांच्यावर तीन आठवडे उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलविण्यात आले होते. मात्र, झाकीर हुसैन यांना इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटलं. त्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला. हा आजार असा आहे की, ज्यावर आजपर्यंत कोणताही उपचार नाही.
झाकीर हुसेन यांची जीवनी
जगविख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन ह्यांचा जन्म ९ मार्च १९५१ रोजी मुंबई येथे राहणाऱ्या पंजाबी कुटुंबात झाला. हुसेन ह्यांची आई बावी बेगम आणि वडील सुप्रसिद्ध तबलावादक उस्ताद अल्लाह रखा आहेत. झाकीर हुसेन हे तबलावादक उस्ताद अल्लारखाँ ह्यांचे सर्वात मोठे पुत्र होते. त्यांच्या कुटुंबाचे अडनाव कुरेशी असले तरीही झाकीर ह्यांना हुसेन हे आडनाव देण्यात आले. हुसेन ह्यांनी माहीम येथील सेंट माईकल्स हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतले. आणि थोड्या काळासाठी त्यांनी सेंट झेवियर कॉलेज, मुंबई येथेदेखील शिक्षण घेतले.
वयाच्या तिसऱ्या वर्षापासून वादन
त्यांच्या वडिलांनी हुसेन ह्यांच्या वयाच्या तिसऱ्या वर्षापासून पखवाज शिकवायला सुरुवात केली. वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी मैफिलींमध्ये सादरीकरण करण्यास सुरवात केली. अल्लाह रखा हे पंजाबमधील तबलावादनाच्या परंपरेतील होते. हुसेन ह्यांनी वयाच्या सातव्या वर्षी पहिली मैफिल सादर केली. ते वयाच्या अकराव्या वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तबलावादन करायला सुरुवात केली. ते १९७० साली सतारवादक पं. रवीशंकर ह्यांना तबल्याची साथ करण्यासाठी अमेरिकेला गेले.
सुप्रसिद्ध शास्त्रीय वादकांबरोबर साथसंगत
झाकीर ह्यांनी लहान वयापासूनच हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील सुप्रसिद्ध वादकांबरोबर साथसंगत करायला सुरुवात केली. त्यांनी पंडित रवीशंकर, उस्ताद विलायत खान, उस्ताद अली अकबर खान, पंडित हरिप्रसाद चौरासिया, पंडित शिवकुमार शर्मा, पंडित व्ही. जे. जोग, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज आणि अशा अनेक गायक आणि वादकांना हुसेन ह्यांनी तबल्याची साथ केली.
पुरस्कार आणि सन्मान
झाकीर यांना १९८८ साली, भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार आणि २००२ साली, पद्म भूषण पुरस्कार राष्ट्रपती अब्दुल कलाम ह्यांच्या हस्ते मिळाला. त्यांना १९९० साली संगीत नाटक अकादमी पुरस्कारानी सन्मानित केले गेले. मात्र झाकीर यांनी आपल्या तबला वादनाने शास्तीय संगीता रसिकांसोबत तरुणाईच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आजही तरुणाई मोठ्या आवडीने त्यांचे तबला वादन ऐकते.
निधन
दरम्यान हुसेन यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी १५ डिसेंबर २०२४ रोजी सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया येथे इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिसमुळे निधन झाले. हा एक श्वसन प्रणालीचा दुर्मिळ आजार आहे, ज्यात फुफ्फुसातील उती कडक आणि घट्ट होतात.
काय आहे ‘इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस’
‘इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस’ हा एक फुफ्फुसांचा आजार आहे. यामध्ये फुफ्फुसाच्या ऊतींमध्ये फायब्रोसिस अर्थात जखमसदृश डाग निर्माण होतो. त्यामुळे फुफ्फुसापर्यंत ऑक्सिजन पोहोचण्यात अडचण येते. हळूहळू फुफ्फुसांची ऑक्सिजन घेण्याची क्षमता कमी होते. मात्र या आजारावर अद्याप कोणताही ठोस असा इलाज डॉक्टरांना आणि संशोधकांना सापडलेला नाही. मात्र, या आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि यापासून दूर राहण्यासाठी काही औषधे मात्र दिली जातात.
इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस हा आजार प्रामुख्याने 50 वर्षांवरील लोकांना होतो. परिस्थिती हळूहळू बिघडत जाते. सुरवातीला कोरडा खोकला लक्षणात्मक दिसतो. हा आजार जसजसा वाढत जातो तसतसे काम करताना, व्यायाम करताना किंवा चढताना श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. आयपीएफ रुग्णांना अनेकदा थकवाही जाणवतो. अनेकवेळा नखे जाड दिसू लागतात, ज्याला नेल क्लबिंग असही म्हणतात.