ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीय पुरुषांची यशोगाथा; लिएंडर पेस (टेनिस)

0

लोकशाही विशेष लेख

यांचा जन्म १७ जून १९७३ साली गोव्यामध्ये झाला. त्यांचे पालक हे खेळाडू म्हणून नावाजलेले होते. त्यांचे वडील हे १९७२ च्या म्युनिक ऑलिम्पिक (Olympics) स्पर्धेमध्ये कांस्यपदक मिळवणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे सदस्य होते, तर आई १९८२ सालच्या भारतीय बास्केटबॉल संघाच्या कर्णधार होत्या. त्यांचे बालपण कलकत्ता या शहरात गेले. १९८५ साली त्यांनी मद्रास (चेन्नई) येथील ब्रिटानिया अमृतराज टेनिस अॅकॅडमीमध्ये प्रवेश घेतला व तेथूनच त्यांचे व्यावसायिक जीवन घडण्यास सुरुवात झाली. १९९० साली विम्बल्डन स्पर्धेच्या कनिष्ट गटाचा विजेता बनून ते प्रथम प्रकाशझोतात आले.

एकेरी पेक्षा दुहेरी प्रकारात त्यांची कामगिरी सरस होती. महेश भूपती यांच्यासोबत त्यांची जोडी जमली आणि त्यांनी अनेक सामने व स्पर्धा आपल्या नावावर केल्या. एकेकाळी त्यांच्या जोडीने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान देखील पटकावले होते. आज पर्यंत ८ पुरुष दुहेरी व १० मिश्र दुहेरी ग्रॅन्ड स्लॅम अजिंक्यपदे प्राप्त केल्यावर जगातील सर्वोत्तम दुहेरी खेळाडूंमध्ये त्यांची गणना केली जाते. सर्वाधिक वय असताना ग्रॅन्ड स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद पटकाविण्याचा बहुमान हा त्यांचाच. १९९६ च्या अटलांटा ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी पुरुष एकेरी प्रकारात कांस्यपदक जिंकले आहे. १९९२ ते २०१६ अशा सलग सात ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भाग घेणारे ते भारताचे एकमेव टेनिसपटू आहेत. इतर स्पर्धांमध्ये त्यांनी भारतासाठी अनेक पदके जिंकली आहेत. डेव्हीस करंडक स्पर्धेसाठी सहभागी होणाऱ्या भारतीय संघाचे ते अनेक वर्ष कर्णधार होते. २०१० साली झालेल्या विम्बल्डन स्पर्धेत विजय प्राप्त करून ते तीन वेगवेगळ्या दशकांमध्ये विम्बल्डन स्पर्धेचे विजेतेपद प्राप्त करणारे रॉड लेव्हर यांच्यानंतरचे दुसरे खेळाडू आहेत.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदकांसह, लिएंडर पेस (Leander Pace) यांना १९९० मध्ये अर्जुन पुरस्कार, १९९६-९७ मध्ये राजीव गांधी खेलरत्न, २००१ मध्ये पद्मश्री आणि २०१४ मध्ये पद्मभूषणने सन्मानित करण्यात आले.


डॉ. निलेश जोशी
जळगाव
७५८८९३१९१२

Leave A Reply

Your email address will not be published.