जळगाव जिल्हा परिषदेसाठी पुढाऱ्यांची रणनीती सुरू..!

0

 

लोकशाही संपादकीय लेख

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे जाहीर झाल्यानंतर जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हटले जाणाऱ्या जळगाव जिल्हा परिषदेचे गट आणि गण जाहीर करण्यात आले असून 21 जुलैपर्यंत गट आणि गण संदर्भात हरकती मागविल्या आहेत. 19 ऑगस्टला गट आणि गणांची अंतिम यादी जाहीर होईल. 20 मार्च 2022 रोजी जळगाव जिल्हा परिषद बरखास्त झाली तेव्हा एकूण 67 गट आणि 134 गणांची संख्या होती. आता जाहीर झालेल्या जिल्हा परिषद गटाच्या संख्येत एकने वाढ होऊन ती 68 इतकी झाली आहे. चाळीसगाव तालुक्यातील सहा ऐवजी सात गट म्हणजे एक गट वाढला आहे. तर अमळनेर तालुक्यातील दोन ऐवजी तीन म्हणजे एक गट वाढला आहेत. तर मुक्ताईनगर तालुक्यातील तीन गटापैकी एक गट कमी म्हणजे दोन गट होऊन आता एकूण संख्या 67 ऐवजी 68 इतकी झाली आहे. सर्वाधिक गट संख्या पाचोरा तालुक्यात आठ इतकी आहे. त्या पाठोपाठ चाळीसगाव तालुक्यातील गटाची संख्या सात इतकी आहे.

गेल्या 20 वर्षापासून जळगाव जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा आहे. गेल्या 25 पंचवार्षिक मध्ये अडीच अडीच वर्ष भाजपच्या महिला सदस्य उज्वला पाटील आणि रंजना पाटील यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा होती, तर उपाध्यक्षपदी भाजपचे नंदकिशोर महाजन आणि लालचंद पाटील यांनी पद भूषवले होते. एकूण 67 च्या सदस्य संख्येत 33 भाजप, 18 राष्ट्रवादी काँग्रेस, 15 शिंदे सेना आणि चार काँग्रेस असे संख्याबळ होते. एकूण 67 पैकी 34 ही संख्या बहुमताचा आकडा गाठणारी होती. भाजपकडे 33 सदस्य होते. एक सदस्य काँग्रेसचे दिलीप पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. म्हणून त्यांच्या बदल्यात काँग्रेसच्या दिलीप पाटलांना सभापती पद देऊ केले होते. अर्थात त्यावेळी महायुती नसल्याने एक संघ शिवसेना आणि एक संघ राष्ट्रवादी काँग्रेस डावलून भाजपने काँग्रेसचा पाठिंबा घेतला होता.

आता परिस्थिती बदलली आहे. राज्यात महायुतीचे म्हणजेच भाजप, शिवसेना (शिंदे) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतर्फेच लढविण्यात येतील असे जरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केले असले, तरी काही जणांवर त्यावेळची परिस्थिती पाहून भाजप स्वतंत्रपणे लढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशीही पाचर फडणवीस यांनी मारून ठेवली आहे. त्यामुळे महायुतीची भाषा केली जात असली तरी ऐन निवडणुकीच्या वेळी महायुती टिकेल की त्याची फटाफुट होईल हे सांगता येणार नाही. कारण भाजपच्या मेळाव्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष असेल, असे महसूल मंत्री बावनकुळे यांनी जाहीर केले असल्याने भाजपची वाटचाल कोणत्या दिशेने आहे, हे सूचक वक्तव्य बावनकुळे यांनी केले आहे.

एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण भागात वर्चस्व चांगले होते. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युती होईल. शिंदेंच्या शिवसेनेला अलगद डावलले जाण्याचीच दाट शक्यता नाकारता येत नाही. जळगाव जिल्हा आमदार आणि खासदारांच्या संख्येचा विचार केला तर नुकत्याच झालेल्या राष्ट्रपती नियुक्त खासदार ऍड. उज्वल निकम यांच्यासह तिनी खासदार भाजपचेच आहेत. त्यापैकी रावेरच्या खासदार रक्षा खडसे हे केंद्रीय राज्यमंत्री असून एकूण 11 आमदारांपैकी पाच भाजपचे, पाच शिवसेनेचे आणि एकमेव अमळनेरचे आमदार अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यामुळे भाजपच्या जिल्ह्यात वर्चस्व असून महाराष्ट्र मंत्रिमंडळात दोन कॅबिनेट मंत्री भाजपचेच आहेत. शिंदे शिवसेनेचे गुलाबराव पाटील कॅबिनेट मंत्री आहेत.

शिंदे शिवसेनेचे भाजप वाटाघाटीतील किती जागा देते, यावर शिवसेने शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व सिद्ध होणार आहे. तथापि धरणगाव तालुक्यातील पाळधी गटातून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांची जागा भाजप त्यांना देण्याची शक्यता आहे. कारण पाळधी गटातून प्रताप पाटील शिंदे शिवसेनेतर्फे विजयी होण्याची दाट शक्यता दिसून येते. तसेच प्रताप पाटील सुद्धा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे दावेदार असले तरी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज हे गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा परिषद लढवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांचा गट फुटला असला तरी शिरसोली किंवा म्हसावद गटातून ते निवडणूक लढवतील. निवडून आल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे भाजपचे उमेदवार असतील एवढे मात्र निश्चित.

पूर्वी भाजप असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य कल्याण सभापती प्रभाकर गोटू सोनवणे यांनी विधानसभेला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश करून चोपडा तालुका विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे निवडणूक लढवली होती. पण ते पराभूत झाले. आता जर त्यांनी शिवसेनेतर्फे निवडणूक लढवून विजयश्री प्राप्त केली तर ते सुद्धा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे दावेदार असतील. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष भाजपचे नंदकिशोर महाजन हे भाजपची एकनिष्ठ असल्याने तसेच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे समर्थक असल्याने ते सुद्धा जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर दावा करू शकतात…!

Leave A Reply

Your email address will not be published.