गावठी पिस्तूल विक्रेत्यासह दोन तरुण ताब्यात

0

जळगाव :- जळगाव एलसीबीच्या पथकाने गावठी पिस्तूल विक्रेत्यासह शस्त्र बाळगणार्‍या दोन तरुणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. जामनेर तालुक्यातील नेरी येथे गुरुवारी दुपारी कारवाई करण्यात आली. गावठी पिस्टलसह तीनही संशयित आरोपींना आरोपींना जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या कारवाईने अवैध शस्त्र बाळगणार्‍यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. शेखर राजेश सुके (रा.कंडारी, ता.जळगाव), गजानन रामेश्वर भोई (रा.नेरी ता. जामनेर) असे गावठी पिस्टल बाळगणार्‍या दोघांची तर योगेश श्रावण सोनार (रा.जामनेर) असे विक्रेत्याचे नाव आहे.

शेखर सुके आणि गजानन भोई हे दोघे तरुण जामनेर तालुक्यातील नेरी येथे गावठी पिस्तूल कब्जात बाळगून दहशत निर्माण करत असल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना मिळाली. पथकाला त्यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर नेरी ते पहूर रस्त्यावरील हॉटेल रोहिणीच्या समोर असलेल्या पानटपरीजवळ गुरुवार, 1 जून रोजी दुपारी दोन वाजता या दोघा संशयीत तरुणांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर अंग झडतीत त्यांच्याकडील गावठी पिस्टल जप्त करण्यात आले. अधिक चौकशीअंती पिस्टल संशयितांनी जामनेर येथील योगेश सोनार याच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली. त्यानंतर पथकाने जामनेर येथून योगेशला अटक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.