घरचे मैदान राखायचेच, एकनाथ शिंदेंचा चंग !

मिसेस मुख्यमंत्रीही प्रचाराच्या रणधुमाळीत

0

नवी मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

ठाणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के मैदानात आहेत. म्हस्केंच्या प्रचारासाठी शिवसेना आणि भाजपाचे नेते, पदाधिकारी विजयाचा चंग बांधून उतरल्याचे दिसत आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे या देखील म्हस्केंच्या प्रचारासाठी रिंगणात उतरल्या आहेत.

लता शिंदे यांनी तुर्भे येथील एपीएमसी मार्केटमध्ये प्रचाराच्या निमित्ताने हजेरी लावली. यावेळी त्यांनी व्यापारी आणि माथाडी कामगारांशी संवाद साधला. एपीएमसीच्या भाजीपाला मार्केटमध्ये उमेदवार नरेश म्हस्के यांचे परिचय पत्र महिला पदाधिकाऱ्यांसमवेत मतदारांना वाटप केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आजवर झालेली विकासकामे पाहता नागरिकांनी महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर सातारा येथील व्यापारी, माथाडी, मापाडी कामगार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील सातारा येथील असल्याने माथाडींची मते आपल्या पारड्यात पाडण्यासाठी महायुतीने एपीएमसीत रणनीती आखली आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्याविरोधात महाविकास आघाडीतर्फे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे विद्यमान खासदार राजन विचारे पुन्हा एकदा लढत देत आहेत. यावेळी शिवसेना नवी मुंबई संपर्क प्रमुख किशोर पाटकर, महिला शहर संघटन शितल कचरे, माजी नगरसेविका सरोज पाटील आदी माहिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.