माजी महापौर ललित कोल्हे जळगाव कारागृहात येणार!
कारागृहातून लढणार निवडणूक : न्यायालयाने केला अर्ज मंजूर
जळगाव महानगरपालिकेची निवडणूक लढविण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याकरीता जळगाव कारागृहात येण्याची परवानगी नाशिक कारागृहात असलेले माजी महापौर ललित कोल्हे यांना न्यायालयाने दिली आहे. याकरीता दि. 29 डिसेंबर ते दि. 3 जानेवारी दरम्यान जळगाव कारागृहात त्यांना आणण्यात येणार आहे.
जळगाव महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून दि. 23 रोजी पासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, बोगस कॉल सेंटर प्रकरणात नाशिक कारागृहात असलेले माजी महापौर ललित कोल्हे हे देखील निवडणुक लढविण्याच्या तयारीत आहे. त्यांनी निवडणुकीची उमेदवारी अर्ज दाखल करणे व इतर प्रक्रिया पूर्ण करण्याकरीता जळगाव कारागृहात येण्याकरीता परवानगी मिळावी या करीता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. त्यांचा अर्ज मंजूर करण्यात आला असून दि. 29 डिसेंबर ते दि. 3 जानेवारी दरम्यान, त्यांना जळगाव कारागृहात येण्याची परवानगी देण्यात आली आहे.
जामीनासाठी उच्च न्यायालयात जाणार!
बोगस कॉल सेंटर प्रकरणात संशतिय म्हणून न्यायालयीन कोठडीत असलेले माजी महापौर ललित कोल्हे यांचा जामीन न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्या विरोधात ते उच्च न्यायालयात धाव घेणार आहे. त्यामुळे कोल्हे हे निवडणुकीपूर्वी बाहेर येतात की, कारागृहातूनच निवडणूक लढविणार याकडे लक्ष लागून आहे.

