बोगस सोयाबीन बियाण्यामुळे विदगावच्या शेतकऱ्याचे मोठे नुकसान; कंपनीविरोधात कारवाईची मागणी
जळगाव प्रतिनिधी
तालुक्यातील विदगाव येथे ईगल कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. शेतकरी नवल पाटील यांनी या कंपनीचे बियाणे वापरून शेतात पेरणी केली असता, 116 दिवस उलटून गेल्यानंतरही पिकाला कोणतीही वाढ दिसून आली नाही. परिणामी संपूर्ण हंगाम वाया जाऊन शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.
नवल पाटील यांनी सांगितले की, “ईगल कंपनीच्या प्रतिनिधींनी आम्हाला 116 दिवसांत सोयाबीनचे पीक येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र कालावधी संपल्यानंतरही पीक अजूनही पूर्णपणे हिरवेच असून दाणे तयार झाले नाहीत. त्यामुळे मजुरी, बियाणे, खत व पाणी या सर्व खर्चाचा भार आमच्यावर आला आहे, पण त्यातून कोणतेही उत्पन्न मिळाले नाही.”
या घटनेनंतर गावातील इतर शेतकऱ्यांनीही ईगल कंपनीच्या बियाण्याच्या गुणवत्तेबाबत शंका व्यक्त केली असून, कंपनीविरोधात कृषी विभागाने तपास करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई मिळावी आणि अशा प्रकारच्या फसव्या कंपन्यांवर नियंत्रण आणावे, अशी अपेक्षा शेतकरीवर्गातून व्यक्त केली जात आहे.