दाणा बाजार परिसरात कोयता घेऊन दहशत माजवणारा तरुण अटकेत

0

दाणा बाजार परिसरात कोयता घेऊन दहशत माजवणारा तरुण अटकेत

जळगाव (प्रतिनिधी): शहरातील दाणा बाजार परिसरात हातात लोखंडी कोयता घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणाला शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अटक केली आहे. ही कारवाई ६ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता करण्यात आली असून, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित विलास निकम (वय १८, रा. गेंदालाल मिल परिसर, जळगाव) हा तरुण लोखंडी कोयता घेऊन दाणा बाजार परिसरात फिरत होता आणि परिसरात भीतीचं वातावरण निर्माण करत होता. याबाबतची गोपनीय माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ पथकाला कारवाईचे आदेश दिले.

पोलीस कॉन्स्टेबल समाधान पाटील आणि सतीश पाटील यांनी संयुक्त कारवाई करत आरोपी रोहित निकम याला अटक केली. त्याच्याकडून लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कॉन्स्टेबल समाधान पाटील यांच्या फिर्यादीवरून ७ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सतीश पाटील करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.