किशोरअप्पा ठाम : भाजपचे चॅलेंज : पालकमंत्र्यांची मात्र सारवासारव!

0

 

लोकशाही संपादकीय लेख

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका आणि ग्रामपंचायतीच्या निवडणूक घोषित झाल्या आणि महाराष्ट्रात सर्वच पक्षांमध्ये हालचालींना वेग आला. जळगाव जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित होण्याआधी पाचोरा भडगाव तालुक्यांमध्ये आमदार किशोर आप्पा पाटील यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची जाहीर घोषणा करून महायुतीला विशेषता भाजपला मोठा धक्का दिला. एक नोव्हेंबरला झालेल्या किशोर आप्पांच्या वाढदिवसाला कृषी उत्पन्न समितीच्या आवारात झालेल्या निर्धार मेळाव्यात किशोर आप्पांनी तसेच त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी स्थानिक भाजप कार्यकर्त्यांवर जोरदार हल्लाबोल केला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी काल पाचोर्‍यात भाजपचा परिवर्तन मेळावा खासदार स्मिता वाघ आणि चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत पारोळा रोडवर समर्थ लॉन मध्ये पार पडला. या मेळाव्यात आमदार मंगेश चव्हाण यांनी किशोर आप्पा यांच्यावर टीका केली.

किशोर आप्पांचा वाढदिवस रेतीमाफीया आणि लाभार्थ्यांनी साजरा केला असला तरी तो निर्धार नव्हे तर गद्दार मेळावा म्हणून हल्लाबोल चढविण्यात आला. एकंदरीत आमदार किशोर आप्पांची पाचोरा भडगाव तालुक्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ‘एकला चलो रे’ची भूमिका जाहीर करून महायुतीला विशेषतः भाजपला धक्का दिला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. किशोर आप्पांच्या निर्धार मेळाव्याला पालकमंत्री गुलाबराव पाटील हे उपस्थित राहिले आणि गेल्या दहा वर्षापासून किशोर आप्पांवर अन्याय होत असल्याने त्यांनी महायुती बरोबर न जाता एकला चलो रे ही भूमिका घेतली असे सांगून आप्पांच्या त्या भूमिकेचे समर्थन केले. तरी खुद्द महायुतीच्या युती संदर्भात राज्य पातळीवर निर्णय घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे किशोर पाटलांच्या संदर्भात बाजू मांडून किशोर आप्पांचे मन वळविण्याचा प्रयत्न करणार आहेत, मी महायुतीच्या मंत्रिमंडळात एक मंत्री असल्याने मला सर्व बाबींचे विचार करावा लागणार आहे, असेही स्पष्ट केले.

अर्थात गुलाबराव पाटील सारवासारव करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु गेल्या वर्षभरात आमदार निधी एकाही आमदाराला मिळाला नाही, हे त्यांनी मान्य केले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात जळगाव ग्रामीण मतदार संघात महायुतीतर्फे युती होऊन निवडणूक लढविण्यात येणार, असे जड अंतकरणाने सांगितले. कारण भाजपतर्फे त्यांच्या पक्षात जे इनकमिंग होते आहे, ते शिवसेनेवर अन्याय करणारे आहे हेही स्पष्टपणे बोलून दाखवले. जळगाव मधील शिवसेनेचे गद्दार पाईप चोर यांना भाजपने पक्षात घ्यायला नको होते, परंतु त्यांनी घेऊन आमच्या जखमेवर मीठ चोळले, असा सूर गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

नगरपालिका आणि नगरपरिषदाच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. 10 नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. 17 नोव्हेंबर पर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. 25 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून 26 नोव्हेंबरला चिन्ह वाटप आणि अंतिम यादी प्रसिद्ध होईल. दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला निकाल जाहीर होईल. जळगाव जिल्ह्यातील 18 नगरपालिकांच्या निवडणुकांचा त्यात समावेश आहे. निवडणूक आयोगाने नगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करताच राजकीय पक्षांमध्ये जोरदार हालचालींना वेग आला आहे. महायुती सत्ताधारी पक्ष म्हणते की, शक्यतोवर महायुतीतर्फे निवडणूक लढविण्याचा प्रयत्न होईल. पण तो प्रयत्न शक्य होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्याची पहिली ठिणगी जळगाव जिल्ह्यात पडली. त्यानंतर ठाणे, नवी मुंबई महापालिकेत भाजप स्वबळावर लढण्याची चढाओढ सुरू झाली आहे.

पाचोर्‍याचे आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा भडगाव तालुक्यात तर ‘एकला चलो रे’ चा नारा दिलाच आहे. त्या व्यतिरिक्त 24 नगरपालिकेत 10 राजपूत समाजाचे नगरसेवक निवडून येतात, म्हणून चाळीसगावला जाऊन किशोर आप्पांनी राजपूत समाजाची बैठक घेऊन सेनेतर्फे राजपूत समाजाचे उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. चव्हाण यांनी किशोर आप्पांना चॅलेंज केले आहे की, आप्पांनी चाळीसगाव नगरपालिकेत एक तरी आमदार निवडून आणून दाखवावा. हे चॅलेंज आहे. त्यामुळे आता महायुतीमध्ये जुंपली आहे. कालच्या भाजपाच्या परिवर्तन बैठकीला मंत्री गिरीश महाजन हे नाशिकला कुंभमेळ्याला हजर राहण्यासाठी गेल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नव्हते. परंतु भाजप नेते आणि कार्यकर्ते यांच्या परिवर्तन मेळाव्यात बोलताना मंगेश चव्हाण यांनी ‘कशाचीही चिंता करू नका, तुम्हाला जे हवे ते मिळेल’ असे स्पष्ट सांगून टाकले. त्यामुळे उमेदवारांना निवडणुकीत अर्थाची कसलीही चिंता राहणार नाही.. पाहूया अजून पुढे काय होते..!

Leave A Reply

Your email address will not be published.