नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
काँग्रेसपासून राजकारणाला सुरुवात केल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना असा प्रवास करणारे व ओबीसींच्या प्रश्नावर सक्रिय असलेले, विदर्भातील माळी समाजाचे नेते, शिवसेनेचे (ठाकरे गट) प्रवक्ते किशोर कन्हेरे स्वगृही परतले. विधानसभा निवडणुकीच्या याद्या जाहीर होत असताना महाआघाडीतील मित्रपक्ष शिवसेनेला काँग्रेसने धक्का दिला.
दिल्ली येथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी किशोर कन्हेरे यांचे पक्षात स्वागत केले. प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी ओबीसींचा चेहरा म्हणून कन्हेरे यांची ओळख करून दिली. ‘पक्षाचे काम करा, पक्ष तुमच्यासोबत राहील’, अशा शब्दांत खरगे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार श्यामकुमार बर्वे, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, माजी मंत्री सुनील केदार, राष्ट्रीय सहसचिव नितीन कुंभलकर आदी उपस्थित होते.
किशोर कन्हेरे यांनी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीत असताना महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसींचे प्रश्न ऐरणीवर आणले. याबाबत न्यायालयात याचिका देखील केली. ओबीसींना संघटित करण्यावर त्यांचा भर राहिला. मात्र, शिवसेनेत त्यांच्या कामाची म्हणजे ओबीसींच्या प्रश्नांची फारशी दखल घेण्यात आली नाही. करोनाचे संकट असो वा राजकीय मुद्दे, पक्षाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कन्हेरे यांची नाराजी सुरू होती. मध्यंतरी ते मंत्री छगन भुजबळ यांचे विश्वासू मानले जात होते.