‘मातोश्री’ला वाचवण्यासाठी स्वतःच्या आईचे नाव..; सोमय्यांचे खळबळजनक ट्वीट

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाविकास आघाडी आणि भाजप नेते यांच्यात अनेक आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या काही मालमत्ता प्राप्तिकर विभागाकडून नुकत्याच जप्त करण्यात आल्या असून यासंबंधी त्यांची चौकशी सुरू आहे.

दरम्यान त्यांच्या डायरीत ‘मातोश्री’ला दोन कोटी रुपये आणि ५० लाख रुपयांचे घडय़ाळ दिल्याची नोंद असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान हा उल्लेख आपल्या आईबाबतचा असल्याचा खुलासा यशवंत जाधव यांनी प्राप्तिकर विभागाकडे केला आहे. यानतंर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ट्वीट केले आहे.

किरीट सोमय्या यांनी ट्विट केले की, ‘हद्द कर दी. यशवंत जाधवांनी घोटाळा लपवण्यासाठी, वांद्रा मातोश्रीला वाचविण्यासाठी स्वतःच्या ‘आई’चे नाव द्यावे.. वाईट वाटते. ५० लाखाचे घड्याळ, २ कोटी रोख. जाधवांनी पोचपावती, बिलही घेतले असेल !!??’.

यशवंत जाधव यांच्या ‘मातोश्री’ भेटीची अंमलबजावणी संचालया मार्फत (ईडी) चौकशी करण्याची मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुंबई भाजप प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. चौकशीतून कोणी सुटू शकणार नाही. आता खूप काही घडणार आहे, असे सूचक वक्तव्य पाटील यांनी केले आहे. तसेच हा उल्लेख आपल्या आईबाबतचा असल्याचा खुलासा जाधव यांनी प्राप्तिकर विभागाकडे केला असला तरी जाधव हे शिवसेनेचे नेते असल्याने त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण करावे, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे.

शिवसेनेच्या भ्रष्टाचाराबाबत पुढील आठवडय़ापासून मुंबईत आंदोलन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. करोनाकाळात ३८ मालमत्ता खरेदी करुन ३०० कोटी रुपये यशवंत जाधव यांनी मिळवले आहेत. जनतेचे लुटलेले पैसे मुंबईकर जनतेला परत मिळाले पाहिजेत, असे भातखळकर यांनी सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.