किरीट सोमय्यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

भाजप नेते किरीट सोमय्या हे सध्या आयएनएस विक्रांत निधी अपहार प्रकरणामुळे अडचणीत सापडले आहेत. त्यांना उच्च न्यायालयाने अटकेपासून मोठा दिलासा दिला आहे.

किरीट सोमय्या यांनी अटक टाळण्यासाठी मंगळवारी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सोमय्या यांनी सत्र न्यायालयाचा आदेश चुकीचा असल्याचा दावा करत या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. गुरुवारपासून सलग आलेल्या सार्वजनिक सुट्टय़ांमुळे याचिका बुधवारीच सुनावणीसाठी यावी, यासाठी किरीट यांच्यातर्फे प्रयत्न केले जात होते.

किरीट सोमय्या यांना अटकेपासून दिलासा देताना उच्च न्यायालयाने तक्रार अस्पष्ट आणि प्रसारमाध्यमांच्या वृत्तांवर आधारलेली असल्याचे निरीक्षण नोंदवले. यावेळी न्यायालयाने किरीट सोमय्यांना चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहावे लागणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

तक्रारदाराने ५७ कोटी जमवल्याचा आरोप कशाच्या आधारे केला याबाबतही तक्रारीत कुठेच उल्लेख नसल्याचेही न्यायालयाने यावेळी सांगितले. यावेळी न्यायालयाने १८ एप्रिलपासून पुढील चार दिवस सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले. तसेच अटक झाल्यास ५० हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

दरम्यान सत्र न्यायालयाने मंगळवारी सोमय्या यांचा मुलगा नील याचाही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. आयएनएस ‘विक्रांत’ला भंगारात जाण्यापासून वाचवण्यासाठी सोमय्या यांनी निधी गोळा केल्याचे, परंतु ते राज्यपालांच्या कार्यालयात जमा केले नसल्याचे पुराव्यांतून स्पष्ट होते, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन सोमवारी फेटाळला होता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.