खोक्या तुरुंगात अन्नत्याग आंदोलन करणार

प्रशासनावर वाढला दबाव, नेमकं काय आहे कारण ?

0

बीड, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या भाई प्रचंड चर्चेत आला आहे. मारहाण आणि प्राण्याची शिकार प्रकरणात अटकेत असलेल्या खोक्या भाईला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याने पोलीस कोठडीत अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून तसे पत्र पोलिसांना दिले आहे.

गुंडगिरी, मारहाण, प्राण्यांची शिकार करणे आदी विविध गुन्हे खोक्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी खोक्याने प्रयागराजला पलायन केले. मात्र उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने बीड पोलिसांनी प्रयागराजमध्ये खोक्याच्या मुसक्या आवळल्या. तर, दुसरीकडे वनविभागाने खोक्याचे घर पाडले. वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या मुद्यावरूनही कारवाई करण्यात आली.

अमानुष मारहाण प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या सतीश भोसलेने आता अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. सतीश भोसले याच्या कुटुंबाला मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे. याबरोबरच त्याच्या घराच्या साहित्याला देखील आग लावण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपींना अटक करावी या मागणीसाठी सतीश भोसलेने पोलीस कोठडीत अन्न त्याग आंदोलन सुरू केले आहे. याबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहे. त्याशिवाय, या पत्राची प्रत मानवाधिकार आयोग आणि अनूसूचित-जाती-जमाती आयोगाकडेही पाठवण्यात आली आहे.

 

खोक्याने लिहिलेल्या पत्रात काय ?

माझ्यावरती 307 चा खोटा गुन्हा दाखल असून मी सध्या शिरूर कासार पोलीस स्टेशन येथे पोलीस कस्टडीमध्ये आहे. मला अटक झाल्यानंतर माझे घर पाडून उद्धवस्त केले. माझ्या घरातील साहित्य काही गुंडांनी जाळून टाकले. ज्यामध्ये जनावरांचा चारा, शेळ्या, कोंबड्या, बदक व काही प्राणी, जळून मृत्युमुखी पडले आहेत तसेच माझे व माझ्या कुटुंबाचे सर्व कागद जळून खाक झाले आहेत. घर पेटवणाऱ्या लोकांनी माझे कुटुंबावर देखील हल्ला केला. ज्यामध्ये लहान मुले, महिला जखमी झाल्या. आज माझे कुटूंब उघड्यावरती पडले असून शासन माझ्या कुटुंबाची कसलीही काळजी घेत नाही. माझ्या कुटुंबाला कसले ही संरक्षण नाही. माझे कुटूंब उन्हात उपाशीपोटी तडफडत आहे. हा माझ्या कुटूंबावरील मोठा अन्याय झालेला असून, हे सर्व मला सहन होत नाही. मी अत्यंत व्यथित झालो असून माझी जगण्याची इच्छा संपलेली आहे. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मी दि.17/03/2025 पासून न्याय मिळेपर्यंत अन्नत्याग करत आहे. मी अन्नाचा एक कणही खाणार नाही, असा इशारा दिला आहे. सरकारने माझ्या या अर्जाचा व माझ्या कुटूंबाचा सहानुभूतीपुर्वक विचार करून तात्काळ माझ्या कुटुंबाला न्याय द्यावा ही हात जोडून विनंती करत असल्याचे खोक्याने आपल्या पत्रात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.