प्रयागराजमधून ‘खोक्या’ला घेतले ताब्यात
बीड पोलिसांची मोठी कारवाई
मुंबई वृत्तसंस्था
बीड पोलिसांनी मोठी कारवाई करत सतीश उर्फ खोक्या भोसले याला प्रयागराजहून ताब्यात घेतले आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी याबाबत माहिती दिली असून, भोसलेचे अनेक गुन्ह्यांत पाय खोलात असल्याचे स्पष्ट झाले आहे. ८ मार्च रोजी सतीश भोसलेच्या घरी वन विभाग व पोलिसांनी संयुक्तपणे झाडाझडती घेतली होती. या कारवाईत ६०० ग्रॅम सुक्या गांजाचा साठा जप्त करण्यात आला होता. काळ्या बाजारात याची किंमत तब्बल ७,२०० रुपये असल्याचे स्पष्ट झाले. त्याचबरोबर, भोसलेच्या घरातून प्राण्याचे वाळलेले मांस देखील हस्तगत करण्यात आले होते.
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सतीश भोसले विरोधात NDPS कायद्याच्या कलम २० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे त्याच्या अटकपूर्व जामीन प्रक्रियेत नव्याने अडथळे निर्माण झाले आहेत. दरम्यान, शिरूर कासार पोलीस ठाण्यात भोसलेविरोधात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
सतीश भोसले उर्फ खोक्या याला अखेर बीड पोलिसांनी प्रयागराज येथून अटक केली आहे.सतीश भोसले गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता, आणि त्याच्यावर पोलिसांचे सतत लक्ष होते. अखेर प्रयागराज येथून त्याला अटक करण्यात आली. त्याच्यावर एकूण तीन गुन्हे दाखल असून, त्यातील दोन शिरूर आणि चकलांबा पोलीस ठाण्यात तर तिसरा गुन्हा वनविभागाने दाखल केला आहे.त्याला आज किंवा उद्या बीडला आणले जाणार आहे.
अशी माहिती बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी बोलतांना दिली .