खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
खामगाव पत्रकारांची मातृसंस्था व प्रतिष्ठीत संघटना म्हणून नावाजलेल्या खामगाव प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा किशोर भोसले बहुमताने विजयी झाले. दोन पॅनलमध्ये झालेल्या या लढतीत स्वाभिमानी प्रगती पॅनलच्या ७ पैकी ६ उमेदवारांनी बाजी मारत विजय संपादन केला.
खामगाव प्रेस क्लबची निवडणूक दि.२३ जानेवारी २०२५ रोजी स्थानिक विश्राम गृह येथे झाली. यामध्ये स्वाभिमानी प्रगती पॅनल व परिवर्तन पॅनलमध्ये सरळ लढत झाली. यावेळी नेमलेल्या समितीने पारदर्शक भुमिका बजावत बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया घेवून निकाल घोषित केला. दरम्यान ७२ पैकी ७० सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी स्वाभिमानी प्रगती पॅनलचे किशोर भोसले हे सर्वाधिक ४४ मते घेवून विजयी झाले. तर उपाध्यक्षपदी नितेश मानकर व किरण मोरे, सचिवपदी अनिल गवई, सहसचिवपदी मोहन हिवाळे, कोषाध्यक्षपदी आकाश पाटील, सह कोषाध्यक्ष पदी मुबारक खान यांनी विजय मिळविला. यानंतर येथील टॉवर चौकात पत्रकार बांधवांनी जोरदार फटाक्यांची आतषबाजी करत डिजेच्या निनादात थिरकून जल्लोष साजरा केला.