औषधी दुकानात घुसून मारहाण प्रकरणी खामगांव पोलीसांची अफलातून कारवाई !

0

 

खामगांव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

स्थानिक अग्रसेन चौक स्थित आयलाणी मेडिकोज या औषधी दुकानामध्ये घुसून निखिल शर्मा याने लक्ष्मण आयलाणी यांच्यासोबत काही कारणास्तव वाद घालून हातापायी केली. सदर घटना 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी लक्ष्मण आयलाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलीसांनी निखिल शर्मा याचेविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. परंतु सदर आरोपीच्या फिर्यादीवरुन शहर पोलीसांनी आयलाणी कुटूंबातील 4 व्यक्तीविरुध्द दंगलीसह इतर कलमान्वये गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे व्यापारी वर्तुळात शहर पोलीसांनी अफलातून कारवाई केल्याची चर्चा होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार निखिल शर्मा याने दुकानात प्रवेश केला यावेळी त्याने लक्ष्मण आयलाणी यांचेकडे नाहक पैशाची मागणी करुन वाद घातला. एवढेच नव्हे तर हातापायीवर सुध्दा आला. यावेळी दुकानात असलेले राम आयलाणी, हितेश आयलाणी व विनय आयलाणी यांनी मध्यस्थी करुन वाद मिटविला. यानंतर लक्ष्मण आयलानी यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीसांनी निखिल शर्मा याचेविरुध्द गुन्हा दाखल केला खरा पण निखिल शर्मा याच्या फिर्यादीवरुन आयलाणी कुटुंबियाविरुध्द दंगली स्वरुपाचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप होत आहे. कारण आयलाणी कुटूंबिय निखिल शर्माकडे गेले नव्हते तर निखिलच हा त्यांच्या दुकानात आला होता. असे असतांना पोलीसांनी आयलाणी कुटुंबियाविरुध्द कोणत्या आधारावर गुन्हा दाखल केला? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

खामगांव शहर पोलीसांच्या अफलातून कारवाई बाबतचे अनेक किस्से यापुर्वी चर्चेत राहिले आहे. त्यामध्ये चोरी गेलेले सरकारी धान्य (हरभरा) खरेदी करणा­या जयकिसान खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांना पाठीशी घालणे, मेनरोड वरील रिगल फुटवेअरचे संचालक शमुन सैफुद्दीन राजा यांच्याविरुध्द मागील वर्षी शहर पोस्टेला दाखल विनयभंगाचा गुन्हा प्रकरण. कारण सदर प्रकरणात पोलीसांनी योग्य व सखोल तपास न करता न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्याचा आरोप शमुन राजा यांनी केला आहे. असे एक ना अनेक अफलातून कारवाईचे किस्से सांगता येतील. त्यामुळे शहर पोलीसांच्या उपरोक्त कारवाई बाबत साशंकता निर्माण होत असून आयलाणी परिवारा विरुध्द खोटा गुन्हा दाखल करुन घेण्यामागील पोलीसांचा उद्देश काय असावा? हे न समजण्याइतपत जनता खुळी नाही. पण पोलीसच अधिकाराचा गैरवापर करुन अन्याय करण्याची भुमिका बजावत असेल तर याकडे वरिष्ठ पोलीस अधिका­यांनी आवुर्जन लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असल्याचे बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.