घाटपुरीच्या वरणगांवकर विद्यालयाचे ग्रा. पं. च्या खुल्या जागेवर अतिक्रमण ?

0

खामगाव (गणेश भेरडे), लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरालगतच्या घाटपुरी येथील किसन नगर भागातील सरलाताई वरणगांवकर विद्यालयाने ग्रामपंचायतच्या खुल्या जागेवर मनमानीपणे अतिक्रमण केल्याचे बोलले जात आहे. याबाबत स्थानिक नागरिकांकडून ओरडही होत आहे. परंतू वरणगावकर परिवाराच्या महसूल प्रशासनात असलेला अधिकाररुपी दबदब्याने कोणताही अधिकारी याविरुध्द कारवाई करण्यास धजावत नसल्याचे दिसून येत आहे.

सुरुवातीला घाटपुरी रोडवरील पाण्याचे टाकीजवळ पडक्या जागेत असलेल्या साबणे हायस्कुलचे कालांतराने सरलाताई वरणगांवकर विद्यालय असे नामकरण झाले. या नामांतराबाबतही वाद असल्याचे समजते. यानंतर सदर सरलाताई वरणगांवकर विद्यालयाचे घाटपुरी ग्रा. पं. हद्दीत किसन नगर भागात स्थलांतर झाले. स्थानिक नागरिकांच्या तोंडी तक्रारीनुसार सदर विद्यालय परिसराची पाहणी केली असता व्यवस्थापनाने विद्यालयाजवळील पाण्याचे टाकीजवळ असलेल्या ग्रा. पं. च्या खुल्या जागेत अतिक्रमण करुन टिनपत्र्याच्या दोन-तीन खोल्या तसेच शौचालय भर रस्त्यात बांधले आहे. यामुळे वावरण्यास अडचण होत आहे. तर शौचालयाच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.

तसेच विद्यालयाच्या पक्क्या खोल्यापैकी दोन खोल्या शिवदांड रस्त्यामध्ये बांधण्यात आल्याचे बोलले जात आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी पुरेसे मैदान सुद्धा नाही. याबाबत यापूर्वीही तक्रारी झाल्या पण त्याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली. वरणगावकर परिवारातील सदस्य महसुल अधिकारी असल्यामुळे या अतिक्रमणाला अभय मिळत असल्याचे बोलले जात आहे.

यासंदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने 17 नोव्हें. 2022 रोजी मुख्याध्यापक गणेश वरणगावकर यांनी काहीही सांगण्यास नकार देऊन संचालक विनय वरणगावकर यांना पाचारण केले. तर विनय यांनी सुद्धा खुल्या जागेतील अतिक्रमणाच्या मुळ प्रश्नाला समर्पक उत्तर देण्याचे टाळून अवांतर विषय चावळत बगल दिली. या एकंदरीत प्रकारामुळे अतिक्रमणाच्या गौडबंगाल बाबत साशंकता निर्माण झाली असून संबंधित अधिकारी व ग्राम पंचायतने योग्य ती कार्यवाही करुन स्थानिक नागरिकांना त्रासातून मुक्त करावे अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.