खजिन्याची अफवा अन् मध्यरात्री शेतात खोदकाम !
मशाली, टॉर्चच्या उजेडाने शेतशिवार झाले लख्य : बऱ्हाणपूर जिल्ह्यातील घटना
रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील असीरगड गावात मुघलकालीन सोन्याच्या नाण्यांची अफवा पुन्हा एकदा पसरली आहे. या अफवेच्या मागे धावत शेकडो लोक मशाली, टॉर्च आणि आधुनिक उपकरणे घेऊन मध्यरात्री शेतात दाखल झाले आणि खोदकाम सुरू केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, परिसरात या प्रकरणाची मोठी चर्चा रंगली आहे.
असीरगडचा इतिहास पाहता या भागात पूर्वीपासूनच खजिना सापडल्याच्या अफवा पसरत असतात. स्थानिक लोकांच्या मते, प्राचीन काळी लढाया आणि लूटमारीच्या भीतीमुळे मुघल सैनिक आणि व्यापारी आपली संपत्ती जमिनीत पुरत असत. या परिसरात पूर्वीही काही वेळा नाणी सापडल्याच्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे लोकांमध्ये ही धारणा अधिक बळावली आहे.
रात्रीच्या अंधारात नाण्यांचा शोध
जयप्रकाश नावाच्या प्रत्यक्षदर्शीच्या मते, बुधवार आणि गुरुवारी रात्री धुलकोटसह अनेक गावांतील लोक शेतात खोदकाम करताना दिसले. काहींनी टॉर्चच्या उजेडात काम केले, तर काहींनी मशाली आणि आधुनिक साधनांचा वापर केला. काही महिलांना येथे पितळ आणि सोन्याची नाणी सापडल्याचे ऐकले होते, त्यामुळे परिसरात मोठी गर्दी उसळली होती.
पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. मनोज अग्रवाल यांच्या मते, असीरगड हा ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा भाग आहे. येथे एकेकाळी राजा आशा अहिर, नादिरशाह, नासिर फारुकी, अकबर आणि इंग्रजांची सत्ता होती. त्याकाळी बँकिंग व्यवस्था नव्हती, त्यामुळे लोकांना मौल्यवान वस्तू जमिनीत लपविण्याची पद्धत होती. आजही जुन्या नाण्यांचा शोध लागतो, मात्र ती सोन्याचीच असतील का, हे तपासावे लागेल.
स्थानिक प्रशासन काय म्हणते ?
या आधीही अशा घटना घडल्या असून, प्रशासनाने कठोर पावले उचलल्याने खोदकाम थांबले होते. मात्र, आता गव्हाच्या पिकानंतर पुन्हा लोक नाणी शोधण्यास आले आहेत. यामुळे स्थानिक प्रशासन आणि पुरातत्त्व विभाग सतर्क झाले असून, अधिकृत उत्खननाशिवाय कोणालाही खोदकाम करू देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. असीरगडमध्ये सोन्याची नाणी सापडल्याच्या बातम्या आणि त्याभोवती पसरलेले रहस्य स्थानिक लोकांसाठी नेहमीच औत्सुक्याचा विषय ठरले आहे. या वेळी खरोखरच काही मौल्यवान वस्तू मिळाल्या का, की हा पुन्हा एकदा अफवांचा बाजार गरम झाला आहे, याचा शोध प्रशासन घेणार आहे. तोपर्यंत, असीरगडच्या भूमीत पुरलेला इतिहास लोकांच्या कल्पनेला अधिकच गती देत आहे.