नाथाभाऊ, गुलाबभाऊंचे एकत्रित स्नेहभोजन !
राजकीय विरोधकांच्या भेटीगाठी : राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
राजकारणातील कट्टर विरोधक असणारे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांच्यात एकत्र भोजन झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नाथाभाऊ, गुलाबभाऊंच्या स्नेहभाजनात मात्र ‘राजकीय खिचडी’ शिजत असल्याची चर्चा आहे. सुमारे अर्धा तास त्यांच्यात चर्चा झाल्याचे कळते. त्यांच्या या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. या उभयतांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याची उत्सुकता साऱ्यांना लागून आहे.
जळगाव शहरातील अजिंठा शासकीय विश्रामगृहात मंत्री गुलाबराव पाटील व आमदार एकनाथ खडसे यांचा एकत्रित जेवण करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील आज पहिलीच जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी एकनाथ खडसे आणि गुलाबराव पाटील एकमेकांवर टीका करणारे दोन्ही राजकीय विरोधकांना एकत्र जेवण करताना पाहून राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.
ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी अजिंठा शासकीय विश्रामगृहातील अँटी चेंबरमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा देखील झाली. त्यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, आमदार सुरेश भोळे आणि इतर नेतेमंडळींनी भोजनाचा आस्वाद घेतला. दरम्यान, एकनाथ खडसेंनी पालकमंत्री गुलाबराव पाटलांची भेट घेऊन जिल्ह्यातील वाढत्या गुंडगिरीबाबत चिंता व्यक्त केली. वाळू माफियांबद्दलही तक्रार केली आहे. सध्या गतिमान शासन जर असेल तर या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गतिमान शासनात भाग का घेत नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
दोघांचे भोजन…अनेकांच्या पोटात गोळा
ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे व शिवसेनेचे आक्रमक मंत्री गुलाबराव पाटील यांचे स्नेहभोजन सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. एकमेकांवर अतिशय तिखट टीका करणारे दोघे दिग्गज एकत्र भोजनाचा आस्वाद घेत असल्याचे पाहून अनेकांच्या पोटात मात्र गोळा उठला आहे.