‘केसरी टूर्स’चे संस्थापक अध्यक्ष केसरी पाटील यांचे निधन

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

‘केसरी टूर्स’ या अग्रगण्य कंपनीचे संस्थापक अध्यक्ष केसरी पाटील यांचे निधन झाले. शनिवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी मराठी माणसाला पर्यटनाची गोडी लावली होती.

केसरी पाटील यांनी वयाच्या पन्नाशीत केसरी टूर्सची स्थापना केली. केसरी टूर्सला जागतिक पातळीवर ओळख मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. या कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील असंख्य नागरिकांना राज्यच नव्हे, तर देश आणि जगभरातील पर्यटनाची गोडी लागली.

अथक परिश्रम आणि संघर्षातून त्यांनी ‘केसरी टूर्स’ला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. त्यांचा वारसा कन्या वीणा पाटील यांनी पुढे नेला. मात्र काही वर्षांपूर्वी त्यांनी वेगळी वाट निवडत ‘वीणा वर्ल्ड’ची स्थापना केली.

दरम्यान, केसरी पाटील यांनी शनिवारी पहाटे जगाचा निरोप घेतला. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत बांद्रा येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. तर त्यानंतर शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

मराठी माणसाच्या मनात पर्यटनाची आवड रुजवून जगाची सफर करण्याची सवय लावणारे केसरीनाथ पाटील यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनक्षेत्राचा दीपस्तंभ अस्तंगत झाला आहे, अशा भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या.

 

Leave A Reply

Your email address will not be published.