ब्रेकिंग : माजी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव यांचा भाजपात प्रवेश
मुंबई (प्रतिनिधी) – भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि मराठमोळा स्टार केदार जाधव यांनी आज (८ एप्रिल) भारतीय जनता पक्षात (भाजपा) अधिकृत प्रवेश केला. मुंबईत आयोजित कार्यक्रमात राज्याचे मंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
क्रिकेटच्या मैदानावर प्रभावी कामगिरी करणारा केदार जाधव आता राजकीय इनिंगसाठी सज्ज झाला आहे. भाजपात प्रवेश करताच बावनकुळे यांनी जाधवचे स्वागत करत सांगितले, “केदार जाधवसारखा प्रेरणादायक खेळाडू पक्षात आल्याने आमच्या कार्यात नवसंजीवनी मिळेल.”
३९ वर्षीय केदार जाधव यांनी 2023 मध्ये सर्व फॉरमॅटमधून क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यांनी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2020 साली न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता.
2014 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या केदारने 73 एकदिवसीय सामन्यांत 1389 धावा, दोन शतके आणि सहा अर्धशतकांची नोंद केली आहे. त्याचबरोबर 27 विकेट्स घेत त्याने अष्टपैलू खेळाडू म्हणूनही आपला ठसा उमटवला. टी-20 सामन्यांतही त्यांनी संघासाठी योगदान दिले आहे.
जरी केदार जाधव यांचा भाजपात प्रवेश निश्चित झाला असला, तरी पक्षात त्यांना नेमकी कोणती जबाबदारी मिळणार यावर अजून स्पष्टता आलेली नाही. मात्र त्यांच्या क्रिकेटमधील अनुभव, मैदानावरील परिपक्वता आणि तरुणांमध्ये असलेली लोकप्रियता लक्षात घेता, आगामी काळात त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
केदार जाधव आता राजकारणातही आपल्या बॅटिंगने सर्वांचे लक्ष वेधून घेतात का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.