संशोधनातून सर्वसामान्यांचे हित वर्धीत झाले पाहिजे !

अरुणभाई गुजराथी यांचे आवाहन : विद्यापीठात राष्ट्रीय कार्यशाळा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

संशोधन करण्यामागचा हेतू हा समाजाच्या उन्नतीसाठी असून संशोधकांनी समर्पित होऊन संशोधन कार्य केले पाहिजे जेणे करुन संशोधनातून सर्वसामान्य जनतेचे हित वर्धीत झाले पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत बोलतांना केले.

विद्यापीठाच्या गणितशास्त्र प्रशाळेच्या वतीने गणित व संख्याशास्त्रातील नवीन प्रवाह (रिसेंट ट्रेंडस्‌ इन मॅथमॅटिक्स ॲण्ड स्टॅटिस्टिक्स) या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्री गुजराथी बोलत होते. यावेळी कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, प्रथम कुलगुरु डॉ.एन.के.ठाकरे, माजी कुलगुरू डॉ.के.बी.पाटील, प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, बेंगळूरु येथील भारतीय विज्ञान संस्थेचे प्रा.अपुर्व खरे, तुर्की येथील इस्तंबुल टेक्नीकल विद्यापीठाचे  प्रा.मुहम्मद कुरले, प्रा.ठाकरे गौरव संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.एस.के.ठाकरे, प्रशाळेचे संचालक व परिषदेचे प्रमुख प्रा.किशोर पवार हे होते.

श्री. गुजराथी पुढे म्हणाले की, संशोधनातून रिमोट आणि रोबोट हे दोन उपयोगी साधने प्राप्त झाले आहेत. संशोधनातील यश हा सातत्यपूर्ण प्रवास असतो. देशासाठी देशातील जनतेसाठी व आपण आपल्या ज्ञानाचा फायदा दुसऱ्यासाठी कसा करुन देऊ शकतो हा विचार संशोधक प्रामुख्याने करीत असतो. प्रा. अपुर्व खरे यांनी अगदी तरुण वयात विविध देशात सेवागौरव प्राप्त करुन पुन्हा भारतात गणित विषयाच्या संशोधनासाठी भारतीय विज्ञान संस्थेत प्राध्यापक म्हणून सेवा देत आहेत. त्यांनी गणितामध्ये केलेल्या संशोधन व त्याच्या कार्याचा सन्मान करुन यावेळी प्रा.अपुर्व खरे यांना गणितरत्न हा पुरस्कार प्रा.ठाकरे गौरव संस्थेच्या वतीन मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.

पुणे विद्यापीठातील प्रा. बी.एन.वाफारे यांनी या पूर्वी दिलेल्या गणितरत्न पुरस्कांरांची माहिती दिली. पुणे विद्यापीठातील प्रा. एम.एम.शिकारे यांनी पुरस्कार सन्मानचिन्हाबाबत माहिती दिली. एस.के.ठाकरे यांनी पुरस्कारासंदर्भातील डॉ. एन.के.ठाकरे यांच्या उद्देशाची माहिती दिली. माजी कुलगुरु डॉ.के.बी.पाटील यांनी प्रा. अपुर्व खरे यांच्या सारखे संशोधक निर्माण होणे गरजेचे असल्याचे सांगुन ते प्रतिभावान संशोधक असले तरी त्यांच्यातील मानवतावाद व साधेपणा हे दोन गुण वाखाणण्याजोगे आहेत असे सांगितले.

 

संशोधन मनुष्याशी निगडीत !

अध्यक्षीय भाषणात कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी सांगितले की, दोन दिवस गणित आणि संख्याशास्त्र यांचा महाकुंभ येथे होत आहे. देशातील व अमेरीका, तुर्की, इटली, इंडोनिशिया, श्रीलंका या देशातील संशोधक या कार्यशाळेत सहभागी होत आहेत. कोणत्याही संशोधनामध्ये गणित आणि संख्याशास्त्र या विषयांची महत्वपुर्ण भुमिका असते. संशोधन हे माणसाच्या अन्न, आरोग्य आणि संपर्कसाधनांची सहज उपलब्धता या तीन महत्वपुर्ण बाबींशी निगडीत झाले आहेत व त्यांनी त्यांचे विचार विस्तृतपणे मांडले. प्रा. अपुर्व खरे यांनी गणितामध्ये केलेल्या उत्कृष्ट संशोधनाबाबत गौरवौद्दगार व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.