कासोद्यात भरदिवसा घरफोडी, दीड लाखांची चोरी

0

कासोदा ता. एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क

शेतात कापूस वेचणी सुरु असतांना शेतकऱ्याच्या घरात भरदिवसा दीड लाखांची चोरी करीत चोरट्यांनी पुन्हा एकदा कासोदा पोलीसांना आवाहन दिले आहे. याप्रकरणी कासोदा पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कासोदा येथील साई पार्क मधील रहिवासी भागवत त्र्यंबक चौधरी हे दि. २५ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी पत्नीसह शेतात कापूस वेचणीसाठी ते घराला कुलूप लावून गेले होते. त्यांच्या मागे सकाळी साडेआठ ते संध्याकाळी ५ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरामधील कपाटाचे लाॅक तोडून त्यातील सोने-चांदीचे दागिने तसेच बॅगमधील ७ हजारांची रोख रक्कम व कापसाचे २ पोटे असे एकूण १ लाख ५८ हजार ७७० रुपयांची चोरट्यांनी घरफोडी करून पसार झाले.

भागवत चौधरी हे संध्याकाळी शेतातून घरी आले असता त्यांना घराचा दरवाज्याचे कुलूप तुटलेले आढळून आले. घरातील कपाट उघडे व त्यातील सामान अस्ताव्यस्त दिसले. भागवत चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कासोदा पोलीसांत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सपोनि निता कायते यांच्या मार्गदर्शनात स.फौ. सहदेव घुले, इम्रान पठाण, समाधान तोंडे, प्रवीण हटकर हे करीत आहेत.

भरदिवसा दीड लाखांची धाडसी चोरी करीत कासोदा पोलीसांना चोरट्यांकडून खुले आवाहनच दिले असल्याची गावात चर्चा असून पोलीसांच्या कामगिरी बद्दल देखील शंका उपस्थित होत आहे. भरदिवसा घरफोडी झाल्याची ही दुसरी घटना असून या आगोदर महिन्यापूर्वीच किराणा दुकानदाराकडे घरफोडीत २ लाख ४० हजारांची चोरी झाली होती तर या आगोदर १६ गाव योजनेतील फिल्टर प्लांट वरुन लाखो रुपयांची पाण्याच्या मोटरी इलेक्ट्रीक साहित्यावर चोरट्यांनी डल्ला मारत पोबारा केला. इतर चोरीचा तपास लावण्यास कासोदा पोलीस अपयशी ठरल्याने चोरट्यांचे धाडस वाढल्याचे या घटनांमधून उमटत असून या चोरीमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.