कासोद्यात फिरती विज्ञान प्रयोगशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव (प्रतिनिधी) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाची फिरती विज्ञान प्रयोगशाळा (Mobile Science Exhibition Unit) दिनांक ११ ऑक्टोबर रोजी कासोदा तालुक्यातील विविध शाळांमध्ये पोहोचली. एकदिवसीय या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कुलगुरू प्रा. व्ही. एल. महेश्वरी आणि प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात आहे. यामुळे आदिवासी, ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान विषयांमध्ये प्रायोगिक अनुभव मिळतो, त्यांची शैक्षणिक आवड वाढते आणि विज्ञानातील नवनवीन संकल्पना प्रत्यक्ष पाहून समजून घेण्याची क्षमता विकसित होते.
राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे समन्वयक डॉ. एस. एस. घोष यांनी कासोदा येथील प्रा. अशोक पाटील यांच्या सहकार्याने या भेटीचे आयोजन केले. या एकदिवसीय उपक्रमात एकूण ८८९ विद्यार्थ्यांनी फिरती विज्ञान प्रयोगशाळेला भेट दिली. या फिरती विज्ञान प्रयोगशाळेने लिटल व्हॅली प्री-प्रायमरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, कासोदा येथील ५४७ विद्यार्थी आणि बालविश्व प्री-प्रायमरी स्कूल, कासोदा येथील ३३२ विद्यार्थी यांना विज्ञान विषयांचा प्रात्यक्षिक अनुभव दिला. या भेटीमध्ये संघप्रमुख उमेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पल्लवी चौधरी, सत्यजित राजपूत, पृथ्वीराज पवार आणि ऋषिकेश चौधरी यांनी बसमधील ३० हून अधिक प्रयोगांची सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली तसेच बस ड्रायव्हर गोरखनाथ बोरसे यांनी देखील या उपक्रमात सहकार्य केले.