रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी I

0

करुणाष्टक -12

सकळ जन भवाचे आथिले वैभवाचे I
जिवलगा मग कैंचे चालतें हेंचि साचें II
विलग विषमकाळीं सांडिती सर्व माळीं I
रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी II

“प्रपंची पाहिजे सुवर्ण I
परमार्थी पंचीकरण II”

हे समर्थ वचन आहे. प्रपंचात पैसा आवश्यक आहे तर अध्यात्मात पंचतत्वाला महत्त्व आहे. साधे हिंदू धर्मातले संस्कार घेतले तरी जे सोहळे असतात व ते एकमेकांसह साजरे करण्यात आनंद वाटतो. नामकरण विधी असतो. लग्न समारंभ असतो. नूतन गृह प्रवेश असतो. मुलांचा वाढदिवस असतो. एकसष्टी समारंभ असतो. भाग्यात सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा ही व्यक्तीच्या आयुष्यात येतो. याप्रसंगी आहे मानपान, मिष्ठान्न भोजन, आलेल्या अतिथींचे व्यवस्थित आदरतिथ्य हे सारे घडावे लागते. यासाठी पैशाची गरज असते. हे सगळे जर उत्कृष्ट झाले तर “वा!” काय सुंदर तजवीज ठेवली होती म्हणून आप्तजन गौरव ही करतात. आपले आर्थिक, मानसिक, शारीरिक कौशल्य पणास लावून त्या “सुखकर्त्याचा” आशीर्वाद व कृपा संपादन करूनच हे सारे होत असते. यात वावगे असे काही नाही म्हणून समर्थ म्हणतात,”सकल जन भावाचे आथिले वैभवाचे” पण या धनाला किती महत्व द्यायचे हा विवेक सुद्धा हवा.

एक अतिशय चिक्कू शेठजी होता. तो रस्त्यान निघाला होता.वाटेत एक साधू भेटला, साधूने थोडे पैसे मागितले. शेटजी म्हणाले ‘मला नदीवर भेट’. त्यांना भेटण्यास नदीवर गेला, ते म्हणाले,’गावी ये’. तो गावी गेला. शेटजी म्हणाले,’ उद्या माझ्या घरी ये’ ठरल्याप्रमाणे घरी गेला. तर शेठजीने मरणाचे ढोंग केले होते. तर त्यांची पत्नी रडत होती. ती साधूला म्हणाली, ‘हे तर गेले आता कुठले पैसे?’ साधू हुशार होता. तो म्हणाला मी आता यांना सरणावर अग्नी देऊनच जातो. तेवढ्यात शेठजी पटकन उठून बसले. म्हणजे काही लोकांना धन हे प्राणा इतकेच प्रिय असते. इतकी धना विषय लालसा नसावी. जनकराजा वैभव पूर्ण जीवन जगत होते. पण ते पूर्ण अलिप्त होते.

विदेही पण माणसाला विवेकानं थोडं तरी प्राप्त होते. पण तसा प्रयत्न करायला हवा. पैसा हा आवश्यकही असतो तसाच तो वाजवीपेक्षा अधिक झाला तर नकळत अवगुण माणसांमध्ये येतात व त्याला केव्हा आले हे सुद्धा कळत नाही कारण संपत्ती आली की अनेक चांगले गुण त्याच्या आश्रयाला आहेत असे मानले जाते. म्हणून संपत्तीच श्रेष्ठ मानली जाते. आपले जिवलग मानसन्मान देतात. एक साधी म्हण आहे ‘असतील शिते तर जमतील भुतं’. सारे नातेवाईक आपले अंकित होतात. हेच जिवलग प्रतिकूल काळात आपल्याला सोडून जातात. एखाद्या सधन व्यक्तीला निर्धन व्यक्ती जवळ आली की भीती वाटते की आपल्याला काही मागणार तर नाही ना? एकदा आपण मदत केली तर पुन्हा पुन्हा ती मागेल काय? असा प्रश्नही उपस्थित होतो व मग नातेवाईक, दूरचे काय पण सख्खे भाऊ सुद्धा एकमेकांपासून दूर राहतात. ही वस्तुस्थिती आहे म्हणजे समर्थ एक ठिकाणी म्हणतात ना ” अरे ही माता, पिता, विनिता, सह्र्द हे सगळे सुखाचे सोबती आहेत दुःखाला तुझ्याबरोबर कोणी नसेल”

म्हणून हा रघुवीरच “सुखाचा दाता” आहे. तो सर्व विषयाचा विश्राम आहे. “रत्नाची” खाण आहे. आनंदाचे धाम आहे. देवांचा तो देव आहे. प्रत्यक्ष शिवाचा तो आराम आहे. भक्तांच्या सर्व कामना पूर्ण करणारा आहे. योगी मुनी सुद्धा त्याचे गुणगान करतात. राम सर्वांच्या जीविचा विसावा आहे. कल्याणा मध्येही तो कल्याण आहे. मंगलाचेही मंगल आहे असे त्याचे स्वरूप आहे. राम कैवल्याचा धनी आहे. “रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजेI” असे त्याचे राम रक्षा पाठात वर्णन आलेले आहे. जिथे राम आहे तेथे विजय आहे. म्हणून समर्थ म्हणतात हे श्रीरामा तू सुखाचा दाता आहेस. तू मारुतीच्या स्कंधस्थानी बसून लवकर ये. तु वैद्यराज हो, मला कृपा औषध दे. अंतकाळी तर तुझ्याच औषधाची मला गरज आहे.

आपण कितीही उच्च पदाधिकारी असो, उच्चशिक्षित असलो, आपले व्यक्तिमत्व साहित्य- कला क्षेत्रात कितीही उत्तुंग असले किंवा उत्तम कर्म करून आपण उत्तम भक्त असलो तरी अंतकाळी रक्षण ‘रामरायाच’ करतो. यासारखे हे सत्य असते वैद्यकशास्त्र व त्यातील प्रगती नाकारता येणारच नाही पण एक क्षण असा येतो, शरीर काही मेडीकल रिस्पॉन्स देत नाही. यावेळी एक फक्त रघुवीर असतो. शंख, चक्र, गदा, पद्म घेऊन तो हरी भक्तांचे संरक्षण करतो. त्याच्या भोवती आत्मबोधाचा पिंजरा विणतो व आपल्या आनंद स्वरूपपाशी भक्ताला घेऊन जातो. त्यासाठी आयुष्यभर यथाशक्ती यथा मती रघुनाथांची कास मात्र धरावी लागते. पण हा त्याच्या दासाची कधीच उपेक्षा करीत नाही. महा संकटात सापडलेल्या गजेंद्राचा भाव पाहून श्रीहरी त्वरित धावून येतात. पापी अजामीळ याचाही उद्धार करून त्याला मुक्त केले. महाभक्त प्रल्हादासाठी ते सिंह झाले. असा हा रघुनाथ आपणा सर्व अनाथांचा वाली आहे. हाक मारताच त्वरित धावून येणार आहे.

II जय जय रघुवीर समर्थ II

लेखिका- भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड ,पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.