अनुतापें तापलों रामराया | परमदिन दयाळा नीरसी मोहमाया ||

0

करुणाष्टक-1

अनुदिन अनुतापें तापलों रामराया l
परमदिनदयाळा नीरसी मोहमायाI
अचपळ मन माझें नावरे आवरीतांI
तुजविण शिण होतो धांव रे धांव आतां I

समर्थ रामदास स्वामी आपल्या करुणाष्टकाची सुरुवात करताना, प्रथम आपल्या चपळ मनाला तू शांत हो, स्थिर हो अशी विनवणी करत आहेत. कारण हे मनच माणसाच्या मुक्तीला किंवा बंधनाला कारण आहे. आपल्या साधकावस्थेत अतिशय आर्ततेने, कारुण्याने आपल्या जिवीची व्यथा ते मांडत आहेत. संसार चित्राचा अनुभव ते मोकळेपणाने व्यक्त करत आहेत व त्यातून संपूर्ण लोकमानसाच मनोगत तंतोतंत व्यक्त झाले आहे. समर्थ सर्वज्ञ होते व द्रष्टेही होते याची साक्ष पटल्या खेरीज राहत नाही.

संसारात त्रिविध ताप आहेत, दुःख आहेत. अध्यात्मिक, आधिदैविक अधिभौतीक असे हे ताप आहेत. प्रत्येक जीवाला त्याचा थोडाफार अनुभव असतोच. पण आपण ही गोष्ट मान्य करीत नाही. आपली नोकरी ठाक-ठीक असते, बँक बॅलन्स असतो, मुलं-बाळ पत्नी उत्तम असते मग कुठला ताप? ही जर मनोभूमिका असेल तर “या मोहमाया तून सुटका कर” अशी विनवणी करण्याचा प्रश्नच येत नाही. ज्याला वाटत असेल आपली या मोह मायेतून सोडवणूक व्हावी त्याच्यासाठी करुणाष्टके.

हाट भरला संसाराचा
नफा पाहावा देवाचा

प्रपंचाचा जमाखर्च, त्यातील डावे-उजवे लक्षात आले पाहिजे. रामकृष्ण परमहंस म्हणत- प्रपंच म्हणजे तीन पायांची तिवई एखादा पाय तरी लंगडा राहतोच. आपणही थोडाफार आजूबाजूला पाहिलं तर हे सहज लक्षात येते. त्यासाठी घरदार सोडून अरण्यात जाण्याची काही आवश्यकता नाही.

म्हणून प्रपंच नेटका करणं हे सुध्दा तितकेच महत्वाचे. पण त्रिविध तापाने पोळलेल्या जीवाला शांत तृप्त करण्यासाठी देव आपलासा करून घेणे हेही कर्तव्यच ठरावा. दैनंदिन जीवनात, आपले वरिष्ठ, साहेब किंवा बॉस यांची आज्ञा शिरसावंद्य मानतो. देव तर सर्वश्रेष्ठ आहेत. “त्यांना न भजावे ??” हा कोणता न्याय असे समर्थ स्पष्ट विचारतात. तर देवाकडे मन का लागत नाही?? हा प्रश्न उपस्थित होतो मग विचारांती लक्षात येते कि देव जोडण्याच्या आड जर काय येत असेल तर ते आपले “मन”.

हे विखुरलेले मन कधी धंद्याच्या चिंतनात कधी नोकरीच्या कधी मुलांच्या कधी शारीरिक मानसिक व्याधीत कधी भुतकाळात तर कधी भविष्यकाळात कधी स्वप्नात तर कधी आशेत असते. एक क्षणही ते देवाचिया द्वारी उभे राहायला निश्चिंत नसते. हे समर्थांना कळून चुकले होते की संसारी माणसाच्या मनाची स्थिती काय असते? म्हणून ते पुढे म्हणतात परमदिनदयाळा निरसी महामाया हे मन तुच अवर कारण या मनावर ताबा ठेवणारा रिमोट हवा आहे. ज्याच्या ताब्यात मन आहे तोच खरा स्वामी. छान घर आहे, अगदी उत्तम फर्निचर आहे, आपण दूरदर्शन वरील छानशी मालिका पाहतोय पण त्याच क्षणी जर एखादी व्यक्ती जे काही प्रतिकूल बोलली असेल ते आठवले तर क्षणात आनंदावर विरजण पडते. हा अनुभव नवीन नाही म्हणूनच अचपळ मन माझें नावरे आवरीतां हे सत्य स्थितीत वास्तववादी चित्रण सहज पटण्यासारखे आहे.

समर्थांना हे विलक्षण निरीक्षण होते तुजविण शिण होतो धांव रे धांव आतां असे तेही दोनदा म्हणतात कारण या मनाची धाव खूप मोठी आहे. त्याची कुठे व कशी विकेट पडेल असे हे सांगता येत नाही. क्षणात ते नामस्मरण करतं तर क्षणात ते अमेरिकेतल्या लेकाच्या किंवा लेकीच्या घरी जाऊन येते. म्हणूनच रामरायाला प्रेमळ साद घालावी लागते. मुलगा कितीही वात्र्य असला तरी आई त्याच्या हाकेला ओ देतेच. तसेच या मनाला सरळ करायला कोणी दंडधारी नाही तर परमप्रिम रामरायाचा हवेत.ज्ञानाने साध्य होईलच असे नाही यासाठी भक्तीच हवी व तीही प्रेमासह कारण प्रेमाने सर्वकाही जिंकता येते हा एक नियम आहे. समर्थांनी हे करुणाष्टक इतके सुंदर लिहिले आहेत की अनुदिनी अनुतापे तापलो रामराया असं म्हणताच डोळ्यात अश्रू यावेत कंठ सदगदित व्हावा. पुढे आपला भार घेण्यासाठी समर्थ आहेत. व पाठीशी परमदयाळु रामराया आहेत.

II जय जय रघुवीर समर्थ II 

भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.