Wednesday, September 28, 2022

नर करणी करे तो नर का नारायण बन जाये ।

- Advertisement -

करुणाष्टक-19

- Advertisement -

तुझ्या प्रीतिचे दास जन्मास आले I 
असंख्यात ते कीर्ति बोलोनि गेले II
बहु धारणा थोर चकीत जालों I
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों II

- Advertisement -

- Advertisement -

असं म्हणतात मोठी माणसं ही जन्मालाच यावी लागतात. तरी ही “नर करणी करे तो नर का नारायण बन जाये I” या प्रयत्न वादाला निर्विवाद महत्त्व आहे. पण जी असामान्य, अलौकीक व्यक्तिमत्व आपण पाहतो त्यांच्याबाबत असं वाटतं की जन्मताच ही माणसं थोर असतात. ज्ञानेश्वर माऊलीं सारखे व्यक्तिमत्व “तैशी दशेची वाट न पाहता I वयसेचीया गावी न येता I बाळपणीचा सर्वज्ञता वरी तयाते I” अशी उपजतच सर्वज्ञता घेऊन निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई असामान्य बुद्धिमत्ता असलेली भावंड जन्मास आले. त्यांच्याबाबत “तुझ्या प्रीतिचे दास जन्मास आले” हेच खरे.

वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहून तयार झाला. आपला प्रबंध पुरा करण्यास तिशी – पस्तिशी सहज येते. संत कबीरांना तर शाळेचा व कागदाचा स्पर्शही झाला नव्हता, तरी ते शेले विणता विणता जीवनविषयक तत्वज्ञान सहजसुंदर भाषेत बोलून जायचे. आत्मज्ञानाच्या शोधार्थ जी मंडळी लहानपणीच बाहेर पडली त्यांच्यावर कोणी सक्ती केली नव्हती. सक्तीने अशा गोष्टी घडत नसतात. तो झरा मूळचाच असतो, भक्तीचा, प्रेमाचा किंवा सामाजिक कार्याचा. नानक लहान होते. शाळेत जाता जाता, शाळा सुटल्यावर एकीकडे गुरं चरायला नेत व स्वतः ध्यानाला बसत. “गुरुग्रंथसाहेब” हा अद्वितीय ग्रंथ त्यांनीच पुढे लिहिला. शीख, मुस्लिम, हिंदू सर्वांनी शिरोधार्य मानला.

स्वातंत्र्य चळवळीच्या लढ्यात जे राष्ट्रभक्त होऊन गेले वीर सावरकर, गोपाळ आगरकर, लोकमान्य टिळक, सुभाष चंद्र बोस देशासाठी यांनीही सर्वस्व अर्पण केलं होतं. देशा वरचे प्रेम हाच त्यांचा प्राण होता. म्हणून तर सावरकर म्हणतात “ने मजसी ने परत मातृभूमीला” प्रेमाशिवाय भक्ती काय किंवा राष्ट्रभक्ती काय संभवतच नाही. चिमणी -पाखरंही संसार करतात पण जेव्हा अशा असामान्य विभूती पाहण्यात येतात तेव्हा त्यांची जीवननिष्ठा, ध्येयनिष्ठा निराळीच होती हे सहज लक्षात येते.

समर्थ म्हणतात या दासांनी “भगवंताची”, “रामरायाची” स्तुती केली, याचाच जीवनभर उद्घोष केला. देवाशी त्यांचे नाते प्रेमाने, प्रितीने बांधलेले होते. भक्तिभाव, भजन, निरूपण, कथा-कीर्तन व नवविध भक्ति द्वारे ते अखंड “भगवतस्वरूप” राहण्याचा प्रयत्न करत अशी भगवंताची किर्ती जीवनभर गाता गाता त्यांचीही किर्ती अमर झाली. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम यांच्या नामाचा घोष आजही सातशे वर्षानंतर आपण करतो.

आपला धर्म व ज्ञान हे सारे मोक्ष व मरण यापुरतेच मर्यादित होते. त्यामुळे व्रतवैकल्य, जपजाप, तीर्थयात्रा, मूर्तिपूजा यालाच अवास्तव महत्त्व आले होते. अशा वेळेस हे संत व दास धावून आले व हृदयात असलेल्या परमात्म्याचे दर्शन घेण्यास सांगितले. संस्कृत भाषेत जे ज्ञान बंदिस्त होते ते समाजातल्या शूद्र घटकांसाठी, स्त्रियांसाठी त्याचं उन्नयन व्हावे म्हणून मराठी भाषेचा आश्रय घेऊन जनमानसापर्यंत पोहोचवले. हे कार्य भगवद्गीतेवरील टीका मराठीत “ज्ञानेश्वरीच्या” रूपाने आणून ज्ञानोबांनी केले.

समाजातले खाच-खळगे आधी भरावे लागतात व मग उंच मनोरे बांधायचे स्वप्न बाळगायचे असते. गंगेचा उगम झाला हिमालयात पण ती सर्वांसाठी खाली आली. तसे सारे संत भक्त हे समाजात येऊन त्यांनी कार्य केले. जे वाङमय निर्माण केले ते सगळ्यांना कळण्यासारखे. एकनाथांचा जागल्या, गोंधळी, बहुरूपी, जोगवा सारखे भारुडे म्हणजे लोक माणसाचे प्रबोधन व्हावे म्हणून त्यांनी केलेली ही योजना किंवा संतांचे “जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले” हे धोरण खरोखरच प्रशंसनीय व समर्थ म्हणतात तसे आपल्याला चकित करायला लावणारे आहे. ‘स्त्रीमुक्ती’ वगैरे शब्द आज आपण वापरतो पण गार्गी, सुलभा, मैत्रेयी, अरुंधती, उमा या स्त्रिया पौराणिक कालात श्रेष्ठ पदाला पोहोचल्या होत्या. त्यांचा उज्ज्वल वारसा घेऊन भागवत धर्मात ही अनेक स्त्रिया संत झाल्या.

स्वतः समर्थांचे किर्ती विषयीचे प्रेम असेच आहे. प्रसिद्धीवर त्यांचा भर नव्हता व चटपटीत प्रसिद्धी मान्य नव्हती.

” भूमंडळी विख्यात व्हावे, किर्तीरूपे उरावे I
ऐसी किर्ती करुनी जावे I निस्पृहपणे विख्यात व्हावे II ”

काहीही खळबळजनक वागून, लिहून सवंग प्रसिद्धी मिळविणे त्यांना अजिबात अभिप्रेत नाही. स्वतःची स्तुती स्वतः करणे, गटबाजी करून प्रकाशात येणे त्यांना मान्य नाही. जे दास असतात, भक्त असतात त्यांची भूमिका अलिप्त हवी. गुरु आज्ञा प्रमाण मानून त्यांनी साधना करावी. सदाचारी वर्तन असावे. ईश्वरनिष्ठ राहून भूतमात्रांवर प्रेम करावे.

श्री पुरंदरदास परम निष्ठेचे विठ्ठल भक्त होते. गुरूच्या आज्ञेवरून त्यांनी सर्व काव्य विठ्ठलास समर्पण केले. त्यांच्या पद रचना यांची संख्या 4,75,000 इतकी आहे. अशा दासांचे हे विक्रम आठवून समर्थांनाही आपण उत्कृष्ट भव्य-दिव्य काही करावे असे वाटते. समर्थांच्या जीवनात त्यांचे “आनंदवनभुवनाचे” स्वप्न साकार झाले व “दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो” अशी स्थिती ही त्यांना प्राप्त झाली.

II जय जय रघुवीर समर्थ II
लेखिका – भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या