रघुकुळ टिळका रे आपलेंसें करावें I

0

करुणाष्टक-14

उपरति मज रामीं जाहली पूर्णकामीं I
सकळभ्रमविरामी राम विश्राम धामीं II
घडिघडि मन आतां रामरुपीं भरावेंI
रघुकुळ टिळका रे आपलेंसें करावेंII

कोण्या एका तालुक्याच्या गावी मंगळवार हा बाजाराचा दिवस होता. दिवसभर बाजारात खरेदी विक्री अगदी जोरात चालली होती. एक मध्यमवयीन स्त्री सगळा माल डोक्यावरच्या टोपलीत घेऊन तिन्हीसांजा झाल्या म्हणून घराकडे निघाली होती. घर बरच लांब होतं. ती पायीच निघाली होती. रस्त्यावरून चालताना स्वतःशी पुटपुटली, “पल्ला बराच गाठायचा आहे. बिगी बिगी जायला हवे” रस्त्यावरच एक गृहस्थ झाडाखाली थांबला होता. त्याच्या कानावर हे शब्द पडले व एकदम त्याच्या डोक्यात प्रकाश पडला अरे हो ! ही स्त्री मनाशी जे पुटपुटली ते खरं आहे. आयुष्य बरच संपत आलय. थोडंच राहिले व भगवंत दर्शन तर खूप दूर पडलय. आता थोडं मनावर घेऊन त्या मार्गावरून चालायला हवं. काहीतरी नाम, सत्संग, ग्रंथवाचन आणि तो उठून चालू लागला नव्हे तद्नुसार आचरण करायचं त्या दिवसापासून त्याचा प्रयत्न झाला कारण त्याला मनापासुन उपरती झाली होती. प्रत्येक व्यक्तीने अगदी संसार दु:खाने दुखावल्या नंतर किंवा विविध तापानं पिडल्यावरच देवाकडे धाव घ्यावी असे नाही, तर ‘थोडा पश्चाताप’, ‘थोडा विवेक’ यांन अंतरंग पालटू शकते.

समर्थांना तर या बाबतीत कोणताही संदेह नव्हता. कारण राम त्यांना भक्तांच्या कामना पूर्ण करणारा एकमेव आनंदाचे धाम वाटत होता. भक्तांचे संरक्षण करणार आहे तोच व त्यांचे भूषणही तोच आहे अशी त्यांची प्रचिती होती. रामरायाच्या चरणाशी गरीब- श्रीमंत, अशिक्षित- सुशिक्षित, मनानं खूप चांगला – वाईट असा भेद न करता जो कोणीही त्याला अनन्य शरण जातो रामराया त्याला प्रेमानं आपलं म्हणतो. संत हे सुद्धा असेच प्रेमळ असतात ते कोणाला दूर ढकलत नाही. गोंदवले येथे ब्रह्मचैतन्य महाराजांकडे एखादा उच्चभ्रू डॉक्टर यायचा व त्यांच्या चरणाशी बसायचा. एखादा मद्यपी यायचा व तो ही दुसऱ्या चरणाशी बसायचा सगळ्यांना आश्चर्य वाटायचे पण त्यामध्ये मद्दपिला उपरती झाली असल्याकारणाने तो बदलण्याचे किंवा त्याला बदलविण्याची ताकद महाराजांकडे होती. त्यांच्या परम प्रेमळ व धीर- गंभीर उदार अशा रामराया कडेही होती.

समर्थ म्हणतात, तू थोडा बदल कर स्वभावाला सज्जन कर कारण हे जग सत्य भासत असले तरी मिथ्या आहे, अशाश्वत आहे. जे डोळ्यांना दिसत ते नाहीसे होणार आहे. ‘रामनाम’ मुखात असू दे. त्याने तुला विजय लाभेल, विश्वास लाभेल, विश्राम लाभेल, विश्रांती मिळेल, सुख, समाधान शांती मिळेल. असे अनेक जण भक्तिमार्गाने जातात व सुखरूप होतात, झाले आहेत. आपला पंढरीचा वारकरी ऊन पाऊस वारा याची तमा न बाळगता ज्ञानोबा, तुकोबांचे अभंग गुणगुणत चालत चालत पंढरी जातो, विश्राम पावतो. अरे ही श्रद्धा, निष्ठा,अवस्था सुदृढ संस्कृतीचे दर्शन घडविते. आपल्याकडचा शेतकरीही भाजी भाकरी खाऊन समाधानी असतो. पाश्चात्य देशात वैज्ञानिक प्रगती इतकी आहे पण रात्री झोपेच्या गोळ्या घेऊन त्या लोकांना झोपावे लागते. प्रतिकूल परिस्थितीत माणूस समाधानी राहतो तो राम उपासना, विठ्ठल उपासना यामुळेच.

उपासनेचा आश्रय सर्वात मोठा असतो. पण उपासना दृढनिश्चयाने करण्याच्या आड येणारी गोष्ट म्हणजे पुन्हा आपले ‘मन’. त्या मनाला थोडं तरी सक्तीने रागवावे लागते. अरे हा प्रपंच, देह आदि गोष्टी आहेत. सत्यनिष्ठ, नित्य ,शाश्वत एक ‘रामरूप’ आपले आत्मस्वरूप आहे. हा विवेक घडी घडी, क्षणाक्षणाला ठेवावा लागतो. रामाच्या सगुण-निर्गुण रूपावर भक्ती करावी लागते. समर्थांचा राघव हा दशरथाचा पुत्र म्हणून ज्ञात असलेला ऐतिहासिक पुरुष नव्हे, राघव रामचंद्राच्या रूपाने प्रकट झाले. या रामापर्यंत आपल्याला जाऊन पोहोचायचे असेल तर समर्थ मार्ग दाखवत आहेत.

घडि घडि मन आता रामरूपी भजावे. आपल्याला सर्व स्वप्ने, इच्छा-आकांक्षा, आशा – वासना, आपली सर्व स्वप्ने हे रामरायाच्या चरणीं एकत्रित व्हाव्या. त्याला आपलंसं करणं म्हणजे आपण न उरणं. गोंदवलेकर महाराज शिष्यांना सांगतात,

“स्वार्थ करा आधारे I तुम्ही राम नयनी जागा II
हाच सुबोध गुरुचा I मीपण जाळुनी या जगी वागा II”

समर्थांचे प्रतिपादन याहून वेगळं नाही. तुम्ही संसार करा. पण उगाच मृगजळाच्या पाठी मागे धावत राहू नका. त्या रघुनाथाची प्राप्ती करून घ्या. आर्ततेने त्याला हाक मारा. त्याच्यापुढे अभिमानी अहंकारी राहू नका भक्ताचे संरक्षण करणे हे त्याचे ब्रीद आहे. त्याला आपलंसं करण्यासाठी काही पथ्य पाळायला हवेत. रघुकुल टिळकाचे रुप आपल्या डोळ्यांनी पाहिले पाहिजे. आपल्या चित्तामध्ये चिंतनही त्याचेच हवे. त्या सर्वगुण संपन्न रामाचे रूप पाहून जिव विश्राम पावावा व त्याचे ध्यान सतत घडावे. तोच माता, तोच पिता व तोच स्वामी व्हावा. ‘एका रामा शिवाय मी काही जाणत नाही’ असे होऊन जावे.

II जय जय रघुवीर समर्थ II

लेखिका- भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.