विषयी जनाने मज लाजविले I प्रपंचसंगे आयुष्य गेले II

0

करुणाष्टक 32

विषयी जनाने मज लाजविले I
प्रपंचसंगे आयुष्य गेले II
समय बहु क्रोध शांती घडेना I
तुजविण रामा मज कंठवेना II

चालता- बोलता विषयत्यागी ऐसा कोण आहे जगीं? हा समर्थांचाच प्रश्न आहे. खाणं, पिणं, हसणं,बोलणं, काम करणं, विचार करणं या सार्‍या क्रिया स्वाभाविक आहेत. आणि परमार्थ मंडळी किंवा भक्त मंडळीही याला अपवाद नाहीत. प्रपंची खाती- पिती आणि परमार्थी काय उपाशी राहती ? कुठल्याही व्यक्तीचा एक क्षणही कर्मा शिवाय जाऊ शकत नाही. तसेच इंद्रियांच्या माध्यमाने विषयांची ओढ मनाला स्वभावतः लागलेली असते. जिभेला चांगले गोड, रुचकर खाण्यास आवडते. डोळ्यांनाही चांगला चित्रपट पाहण्यास आवडतो. कानाची धाव मधुर संगिताकडे असते. एकुणच विषयांवर प्रेम करणे शिकवावे लागत नाही. निसर्गतः शरीर, मन, बुद्धी यांना आपापल्या पातळीवर काही आवश्यकता असतात व त्या पुऱ्या करणेही इष्ट असते. आवश्यकतेच्या काटेकोर मर्यादेच्या आत अपेक्षांची पुर्तता करणे यात वाईट काहीच नाही. परंतु मोहाने ही मर्यादा कळत-नकळत ओलांडली जाते आणि या विषयाचे रूपांतर विकृतीत किंवा विकारात होते.

पण जगाची रीत पाहता, बऱाच काळ हा विषयचा भोग घेण्यात जातो. कर्तव्यकर्म म्हणून संसार केला तर फार कमी वेळ जातो. पण हौसेने केला तर बराच वेळ वाया जातो असं गोंदवलेकर महाराज म्हणतात आणि कुठल्याही कार्यक्रमात आपण पाहतो मुंज असो, लग्न असो हौशेमुळे कोलाहल, गडबड इतकी होते की बराच काळ त्याने व्याप्त होतो आणि मग स्वतःच लग्न, मुलाचं लग्न, नातवाचं लग्न असं चक्र चालूच असते. प्रभूप्राप्तीचा विचार करायलाही वेळ राहत नाही. म्हणुन समर्थ म्हणतात, “विषयी जनाने मज लाजविले.”

प्रपंचसंगे आयुष्य गेले. प्रपंचातही शिक्षण, पैसा, नोकरी, धंदा, व्यापार यासाठी प्रयत्न करावे लागतात. कष्ट घ्यावे लागतात. वर्षानुवर्षे त्यात वेचावी लागतात. तेव्हा प्राप्ती घडते. “असेल हरी तर देईल खाटल्यावरी?” असं होत नसतं. पौरुषाने गोष्टी मिळवाव्या लागतात. रात्री जागुन अभ्यास करावा लागतो. व्यापारात सावध व दक्ष असावं लागतं. नाते संबंधांसाठी उदंड झिजावे लागते. जावयासाठी, मुलांसाठी, बायकोसाठी अहोरात्र राबणाऱे जीव असतात. “संसाराच्या अंगी अवघीच व्यसने”. पुन्हा या संसारात कलह, आजारपणात, व्यापारातले फायदे-तोटे हे सारे येतेच आणि कळत नाही हे आयुष्य केव्हाच संपून जाते. म्हणून समर्थांनी इथे खंत व्यक्त केली आहे की, देवाची सेवा देवाचे सख्यत्व हे कधीच संभवत नाही. मग थोरवी संपादन करणे तर दूरच राहते. लोकांनी पिढ्यानपिढ्या त्यांचे गुण गात राहिले पाहिजे असे शंकराचार्य, ज्ञानदेव, तुकाराम, शिवाजी, अहिल्याबाई ही उत्कृष्ट उदाहरणे. अशी किर्ती सत्तेने वा संपत्तीने विकत घेता येत नाही. तर ती शील, चारित्र्य, कर्तुत्व, त्याग, औदार्य, पराक्रम, जनहिताची तळतळ इत्यादि सदगुणांच्या बळावर झालेली असते व ती चिरकाल टिकतेही.

सर्वसामान्य माणसांना हे सारे अवघड असते. कारण त्यांनी इंद्रियावर व षड्रिपुंवर विजय मिळवलेला नसतो. क्रोध जिंकला असे वाटते पण तो नसतो. क्रोधामुळे कोतेपणा येतो. मागच्या पिढीत एक फार मोठे नामवंत साहित्यिक, संशोधक होऊन गेले. हे संशोधक एका गावी पाहुणे म्हणून गेले. यजमानाने त्यांना माडीवरची चांगली उजेडाची प्रसन्न खोली राहण्याकरता दिली. पलीकडे पटांगण होते तेथे शाळेतील काही लहान मुले खेळत होती. त्यांच्या आरडा-ओरड्याने हे संशोधक अस्वस्थ झाले. त्यांनी मुलांना दरडावले. मुले अधिक चेकाळली. आपल्या शत्रूंनी आपणास त्रास देण्यासाठी मुलांची बुद्धया योजना केली आहे आणि त्या संतापाच्या भरात नियोजित संशोधन सोडून ते थोर संशोधक निघून गेले. क्रोधाने विचारात विस्कळीतपणा व विसंगतीही येते.

“समय बहु क्रोध शांती घडेना” समर्थ असे म्हणतात. ते याचसाठी मनासारखे व अनुकूल साऱ्या गोष्टी असल्या की शांती मिळत नाही. हे स्वाभाविक असते. पण जर का आपल्या मनाविरुद्ध व प्रतिकूल एखादी जरी गोष्ट घडली तरी आपल्या कपाळावर आठी उमटते. प्रतिकूल प्रसंग ओढवत असतात. अशा वेळीही शांत राहण्याचा अभ्यास केला पाहिजे. काहीवेळा कर्तव्यबुद्धीने रागवणे अवश्यकही असेल. पण तो क्रोध आलेला असता कामा नये, आणलेला असला पाहिजे. म्हणून संतापाच्या आधीन होऊ नये. पण प्रसंगविशेषी कर्तव्यबुद्धीने क्रोध दुसऱ्याच्या चांगल्या साठी आणता आला पाहिजे. एकनाथांना शांतीधाम म्हणतात.

ते प्रत्यक्ष त्यांच्या जीवनात मूर्तीमंत शांतीसागर होते. नाथांचा मुलगा हरी हा तीव्र बुद्धीचा व संस्कृत भाषेचा जाज्वल्य अभिमान असलेला होता. आपले वडील प्राकृत ग्रंथ लिहितात व परमार्थाचा उपदेश करतात याचा त्यास राग येई. ते घर सोडून काशीस गेले. नाथ काशीला गेले त्यांनी हरिपंडितास पुराण करत जावा अशी केली. त्यांना सांगितले मी उद्यापासून पुराण सांगणार नाही माझा मुलगा हरि पुराण सांगेल. तुम्ही रोज येत जा. दुसऱ्या दिवशी हरि पुराण सांगू लागला. त्याच्या पुराणात पांडित्याची प्रभा होती पण भक्तीप्रेमाचा सुवास नव्हता. नाथांचे पुराण श्रोत्यांच्या हृदयाला जाऊन भिडत असे. पंडितांचे डोक्यावरुन जाऊ लागले. परिणाम व्हायचा तोच झाला. एकेक श्रोता वाड्यातून निघुन जाऊ लागला. शेवटी दोनच लोक राहिले ‘आत हरी बाहेर हरी’. पंडिताला आपल्या वडिलांचे मोठेपण कळले. त्यांना खात्री झाली नाथ म्हणजे “हे विश्वचि माझे घर I ऐसी मती जयाची स्थिर I”आपली मती अशीच व्हावी म्हणून समर्थ रामराया कडे प्रार्थना करतात.

II जय जय रघुवीर समर्थ II
लेखिका -भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.