सुटे ब्रीद आंम्हीसि सांडूनि जातां I रघूनायका मागणें हेंचि आतां II

0

करुणाष्टक -30

ब्रिदाकारणें दीन हातीं धरावे I
म्हणे दास भक्तांसि रे उध्दरावें II
सुटे ब्रीद आंम्हीसि सांडूनि जातांI
रघूनायका मागणें हेंचि आतां II

दासगणू महाराजांची एक सुंदर प्रार्थना आहे,
अनंत अपराधाच्या राशी पोटी घालणे I
महानपापी परी तु मज आपुला म्हणणे I
पतित पावना ऐसे आपण नाम धरिलेसी I
आता पतीता उपेक्षिने योग्य नव्हे तुजसि I
दिनानाथ, विश्वंभरा, करूणावतारा I
दासगणूला नको लावू विन्मूख माघारा I

सर्वच भक्तांचे, साधकांचे किंवा होऊन गेलेल्या थोर थोर संत महंतांचे देवाशी जे मागणे होते ते हेच होते. आपलं पतितत्त्व, दीनत्व नाहीस करून आपलं ‘ब्रीद’ भगवंताने खरे करावे. कारण तोच खरा सर्वसामर्थ्यवान व षड्गुणाऐश्वर्य संपन्न असल्याने त्याच्या कमलवराने जो काही प्रसाद मिळेल तोच आमचा उद्धार करेल याचीही त्यांना खात्री होती. मग जनाबाई, मीराबाई, वेणाबाई, कान्होपात्रा कोणीही असो त्या लाडीकपणे भगवंताशी भांडतानाही त्याला प्रेमळ अट घालायच्या ! ‘तुझ्याशिवाय आम्हाला कोण तारणार ?’ कान्होपात्रा आपल्या अभंगात म्हणते, “पतित तु पावना, पावना, म्हणविशी नारायणा, तरी संभाळी वचना” तु माझ्या वचनाला, ब्रीदाला सांभाळ व आंम्हाला पैलपार ने.

आमचा हात धरून सहाय्य करून तु ह्या भवसागरातून आमची सोडवणुक कर. कारण याबाबतीत आम्ही असमर्थ आहोत. तु दीनांचा नाथ आहेस. अनाथांचा माहेरघर आहेस. करुणेचा सागर आहेस. दीनवत्सल, भक्तवत्सल, परमप्रेमळ आहेस. तु उदार आहेस. भक्तीने तु प्रसन्न झालास तर ‘अनंत हस्ते कमलवराने देता किती घेशील दो कराने’ अशी स्थिती माणसाची होते. आजवर अनेक भक्तांना तु हाताशी धरले. त्यांचा उद्धार केलास याची आठवण होते. उपमन्यु लहान होता तेव्हा त्याच्या मामा बरोबर एका यज्ञप्रसंगी गेला. तेथे गायीचे दुध त्याला प्यावयास मिळाले. घरी आल्यावर आईजवळ त्याने दुधासाठी हट्ट केला. पण घरी दारिद्र्य होते. तिने पिठात पाणी कालविले व त्याला दिल. त्याला चव समजली. तो हट्ट सोडेना. ती माउली म्हणाली, ‘तु देवाजवळ माग कारण तोच सर्वसमर्थ आहे. तुझे वडिल तर आयाचित वृत्तीचे आहेत. ते तुला दुध देऊ शकणार नाहीत. हे ऐकताच ध्रुवाचा निश्चयाने उपमन्यू बाहेर पडला. उग्र तपश्चर्या केली. शंकर प्रसन्न झाले व शंकरांनी दुधासाठी उपमन्युला ‘क्षीरसागर’ च भेट दिला.

ध्रुवाची योग्यता व तप पाहुन त्याला अढळ ध्रुवपद दिले. अजामेळाला अनुताप झाला. तो पातकी होता. पण भक्तिमार्गाला लागताच त्याचा तु उध्दार केलास. प्रल्हादासाठी नरसिंहाच्या रूपात तु खांबातुन प्रगटलास तर इंद्राच्या संगतीने भ्रष्ट झालेल्या गौतम पत्नी अहिल्येचा उद्धारासाठी प्रभू रामचंद्रांनी तिच्या निर्मनुष्य आश्रमात आवर्जुन येऊन तिचा उद्धार केला. भर राज्यसभेत द्रौपदीचे जेंव्हा वस्त्रहरण झाले तेव्हा तिने प्रथम बुद्धीस आश्रय घेऊन भीष्म, द्रोण, पांडव यांचा धावा केला पण काही उपयोग झाला नाही. शेवटी तिने भगवान कृष्णाचा धावा केला तेव्हा अगणित वस्त्रे पुरवून त्यांनी तिचे रक्षण केले. ह्या सार्‍याच कथा तु भक्ताला हाताशी धरून उद्धार केल्याचा व तुझे ब्रिद संभाळण्याचे दाखले देत नाहीत काय ?

एवढेच करून तु थांबत नाहीस. तर भगवंता आजवर दीन- अनाथांच्या रक्षणासाठी तु अनेक अवतार घेतले आहेत. त्यातील नऊ झाले आहेत. एक कलकीचा अवतार कलीयुगाच्या शेवटी होणार आहे व पुन्हा सत्ययुगाला प्रारंभ होणार आहे. तुझे उज्ज्वल चरित्र, अलौकिक सामर्थ्य, षड्गुणैश्व्यर्य संपन्न हे व्यासा सारख्या अलौकिक प्रतिभेला व वेदांनाही साधणार नाही असे आहे.

तु जर आम्हाला तुझ्या छत्राखाली घेतले नाहीस तर ‘सुटे ब्रीद आंम्हीसि सांडूनि जातां’ असे होईल. आमच्या जवळ युक्ती, बुद्धी, शक्ती नाही. पोटासाठी धावण्यात आमचा दिवस जातो. मन ही आवरत नाही. कल्पना सैरावैरा धावतात. संसार नीट नेटका नाही. जीवाला उद्वेग वाटतो. परमार्थही कळत नाही. उगीच लोक मला हसतात. माझे असे कोणी नाही. समर्था मी दीन आहे निश्चितच पण तु दयासिंधू आहेस. मी काया, वाचा, मनाने तुझा म्हणवितो. ह्याची लाज तुलाच आहे. तु देवांना बंदीतुन सोडविलेस, भूमीचा भार उचललास, तु भक्तांचा मोठा आश्रय आहेस. तुझे भक्त उदंड आहेत. तिथे मला कोण विचारतो? तुझे ब्रीद तु राख. हे दयाळा, मजवर दया कर. मला आणखी काही नको. माझी लाज तु सांभाळ.

हा भक्तीचा पंथ अनंत असा आहे. तसाच तो एकदम सुगम नाही. संत तुकारामांसारखे सर्वश्रेष्ठ भक्तही म्हणतात, “माझे चित्त तुझे पायी I राही ऐसे करी काही I धरोनिया बाही I भव हा पारी दातारा I” त्या जगदीशाच्या आधारा विना काही शक्य होत नाही. कृपाळू संत- सज्जनांनी अंगीकार केला तर या मार्गावरचे श्रम हलके होतात. आई जसे लहान मुलाला नाना यत्न करून वाढवते तसे शरणागताची चिंता ही संत मंडळ करतात. साधुपुरुष करतात. त्यांच्या आश्रयात लोखंडाला परिसस्पर्श झाला की सुवर्ण होतं इतकं सामर्थ्य असतं. कारण ही मंडळी दैवी गुणांनी मंडित असतात. गीतेतही म्हणुन सांगितले आहे, “जे माझे अनन्य भक्त आहेत त्यांचा योग क्षेम मी चालवतो.” समर्थ म्हणतात, “रघुनायका तु आम्हाला उपेक्षु नकोस. तु मंगलाचे ही मंगल करणारा आहेस. सदा कृपाळू आहेस. भक्तानं एक पाऊल तुझ्या दिशेने टाकलं की तु चार पावले टाकुन त्यांच्याकडे येणारा आहेस आणि तुझे पतितपावन हे ब्रीद अचल आहे. ते कल्पांतीही तु सोडणार नाहीस.”

II जय जय रघुवीर समर्थ II
लेखिका -भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे.

K

Leave A Reply

Your email address will not be published.