संतांची मागणी ही स्वतःच्या नाही, विश्वाच्या सुखासाठी

0

करुणाष्टक -29

समर्थांपुढें काय मागों कळेना I
दुराशा मनी बैसली हे ढळेना II
तुटो संशयो नीरसीं सर्व चिंता I
रघूनायका मागणें हेचि आतां II

जीव हा अल्पशक्तीमान आहे. अल्पश आहे. तर परमात्मा, तो भगवंत सर्व श्रेष्ठ सर्वसत्ताधीश व सर्व शक्तिमान आहे. तो यंत्र आहे आपण यंत्री आहोत. ‘झाडाचे पान हालते’ ही त्यांची सत्ता आहे. यश,श्री, औदार्य, ज्ञान,वैराग्य, ऐश्वर्य या षड्गुणांनी तो युक्त आहे. गुणांचा सागर आहे. दयेचा निधी आहे पण त्याच्याकडे फक्त ‘रुपं देही, धनं देही, सुखं देही’ एवढच मागुन थांबायचे का? का जे शाश्वत व अविनाशी असं परमतत्व आहे, ज्यांच्या लाभाने शांती , समाधान, तृप्ती, प्रसन्नता, आपल्याला मिळणार आहे? अनिर्वाच्य समाधान जे कधीही ढळणार नाही त्याची प्राप्ती होणार व त्यासाठी आपण त्याच्याकडे सद्बुद्धी मागायची? हा प्रश्न ज्याचा त्याचा आहे.

आपणही ‘मारुतराया’ कडे शक्ती, बुद्धी, युक्ती मागतो. ‘विघ्नहर्ता गणराया’ला विद्या मागतो. ‘देवी’कडे लक्ष्मी, वैभव, बल मागतो. पण याही पलिकडे जाऊन भगवंताला काय मागायचं ? हे संत आपल्याला शिकवतात, ‘जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रति वाढो’ अस पसायदान माऊलीने मागितलं. तर संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी, ‘हेचि दान देगा देवा I तुझा विसर न व्हावा I’ किंवा ‘मागणे ते देवा I आम्हा तुझी चरणसेवा I आणखी ॠध्दी, सिद्धी आम्हाला नकोत असं स्पष्ट सांगितलं. नामदेव महाराज मागण मागतात,

‘आकल्प आयुष्य व्हावे तयां कुळा I
माझिया सकळां हरिच्या दासा I
कल्पनेची बाधा न हो कोणे काळी I
हे संत मंडळी सुख असो I
अहंकाराचा वारा न लागो राजसा I
माझिया विष्णुदासा भाविकांसी I
नामा म्हणे तया असावे कल्याण I
ज्या मुख्य निदान पांडुरंग II’

भावार्थ रामायणाम संत एकनाथ महाराज प्रार्थना करतात,
‘आता सकळांशी हेचि प्रार्थना I
अर्हनिशी स्मरा रघुनंदना I
म्हणूनि घालीतसे लोटांगण I
तुम्हा संत चरणाशी I’

संतांच मागणं हे असं अंतिम सुखापर्यंत, केवळ स्वतःच्या नाही तर विश्वाच्या सुखासाठी असतं. त्यांच्या सात्विक मन- बुद्धीचे ते प्रतीक असतं म्हणुन सर्वसामान्य प्रापंचिक मनुष्याची दशा समर्थ वर्णतात तशी “समर्थांपुढे काय मागो कळेना?” अशी असते. गोंदवलेकर महाराजांकडे कोणी संसारिक गोष्टींची पुर्तता व्हावी म्हणून मागणी केली की ते म्हणत, “अरे ! रामनाम जपायची सद्बुद्धी मागा. तो कल्पतरु आहे. रामनाम ही कामधेनु आहे. ते सोडून तुम्ही इतरच मागता ?” याचे ते नवल करत. कारण शेवटी हे तर सत्यच आहे, ‘न मागे त्याची रमा होय दासी’ पण आपल्या आशाबद्ध मनात नाना वासना, कामना, लालसा यांनी घर केलेले असते. आशेची बेडी आपल्याला बद्ध करते. चित्त ठिकाणावर राहत नाही. विचार न करता एखादी गोष्ट केल्याने नंतर त्यावर विचार करून फायदा होत नाही, दुश्चित चित्ताने कार्य नासते.

चिंता वाढत जाते. स्मरण राहत नाही. अनेक प्रमाद घडत जातात. दुराशा मनातील ढळत नाही. तंत्र विचित्र असतं. चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टी चटकन ग्रहण होतात. ‘अमुक एक व्यक्ती अमुक साली मला असं बोलली, विसरेल काय?’ असं सारं मनात खोलवर तळ ठोकून असत. त्यातुन नाना प्रकृतीच्या, प्रवृत्तीच्या माणसात आपण वावरत असतो. तेव्हा तर आशा, उदासिनता, अप्रसन्नता, उद्रेग, चिंता वाढत जातात. ताण-तणाव पर्यंत मजल जाते. उगाचच ‘डिप्रेशन’येते. हे सारं का घडतं? तर रघुनाथाची अती आदरे सेवा करायची तसदी आपण घेत नाही. नाहीतर तुकाराम महाराज म्हणतात तसे,

“हरीच्या दासा चिंता, हे तो अघटित वार्ता I
खावे, प्यावे, ल्यावे तुका म्हणे पुरवावेI”

किंवा नाथ म्हणतात तसे
“नको खेद करू कोणत्या गोष्टींचा I
पती लक्ष्मीचा जाणतसे I”

पण हा विश्वास साधु-संतांच्या ठाई असतो. आपण चिंता करतो. ते चिंतन करतात. भगवंताचा ध्यास घेतल्याने त्यांचा जीव ‘ब्रह्मस्थितीला’ प्राप्त होतो. संतांनाही लौकीक, सुख-दुःख असतात. पण ते त्यात अलिप्त राहु शकतात.

सुख- दुःख, निंदा-स्तुती,आपला- परका, पाप-पुण्य याच्या पलीकडे ते साधनेने जातात. यासाठी समर्थ पुन्हा एकवार मागणे मागतात,”तुटो संशयीनीरसी सर्व चिंता” आमच्या सर्व चिंता, काळज्या तु झटक. कारण चिंता सोडायची म्हटली तर त्याक्षणी सुटते, नाहीतर कधीच सुटत नाही. ती आपल्या चित्ता पाशी आहे. अगदी लेकाला शाळेतुन यायला उशीर का झाला ? ते प्रमोशन किंवा बदली मंजुर होईल ना ? रिझल्ट काय लागेल ? मेडिकल रिपोर्ट काय ? हजार चिंता काही सुचू देत नाहीत.

समर्थ रामरायाला आता तुझ्या कृपा छत्राखाली मी निर्धास्त राहावे. संशयाचं समुळ उच्चाटन व्हाव. साऱ्या चिंताचे निरसन व्हाव व ‘आनंदवनभुवन’ साकार होऊन रामरायाशी सख्य व्हावं, सेवा व्हावी. त्याच्यावर जिवाभावाने प्रिती जडावी आणि जन्माला आलोच आहोत तर काहीतरी किर्ती करून जावे.

पण रघुनायका, हे अपराधी जन चुकणारच तेंव्हा तुच त्यांना सावर. “कल्याण करी रामराया I जनहित विवरी तळमळ तळमळ होतीच आहे I हे जन हाती धरी I “

समर्थांचे स्वतःच हे मागणे आजही चिरतरुण आहे. पुढेही राहील.

II जय जय रघुवीर समर्थII

लेखिका -भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड,पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.