Friday, May 20, 2022

नसे भक्ति, ज्ञान, ध्यान। काही नसे प्रेम हे राम विश्राम ।

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

करुणाष्टक 24

- Advertisement -

नसे भक्ति ना ज्ञान ना ध्यान काही I
नसे प्रेम हें राम विश्राम नाहीं II
असा दीन अज्ञान मी दास तूझा I समर्था जनीं घेतला भार माझा II

- Advertisement -

हरी भक्त पारायण सोनोपंत दांडेकर यांच्याकडे एक ग्रामीण भागातील पालक आपल्या मुलाला घेऊन आला व त्यांना म्हणाला, हा मुलगा उडाणटप्पूपणा करतो, अभ्यासात लक्ष नाही, धंदा नीट करेल का नाही कोण जाणे? तुम्ही याला किर्तन- प्रवचन काहीतरी शिकवा.” यावर सोनूमामा हसले, म्हणजे लोकांच्या मनात परमार्थाविषयी किती गैरसमज असतात. म्हणजे ज्याला काही समजत नाही त्यांनी परमार्थ करायचा. “हरी हरी” करायचं असं थोडंच आहे ? अध्यात्मविद्या ही इतकी सुक्ष्म आहे की ती ग्रहण करण्यासाठी माणसाची तयारी उत्तम असावी लागते. बुद्धी तीव्र असावी लागते. मन एकाग्र व शुद्ध लागते, शारीरिक क्षमता ही उत्तम लागते तरच दैवी गुण अंगी बाणण्याची तयारी होते व भक्ती- ज्ञान- ध्यान या गोष्टी जमतात. फार मोठे धैर्य लागते. प्रपंच व परमार्थ दोन्ही साधण्यासाठी उत्तम गुणांची वृद्धी दिवसेंदिवस व्हावी लागते.

समर्थ ही प्रतिपादतात, भक्ती- ज्ञान- ध्यान हे सहज सोपं नाही तर या गोष्टी अवघड आहेत. भक्ती म्हणजे केवळ पुजा, व्रत ,उपवास, जप एवढच नाही तर भक्तीचे वर्म ज्याच्या कडे असेल तर त्याच्या घरात शांती, क्षमा, दया पाहिजे. संत तुकाराम महाराज म्हणतात, भक्ती तर कठीण ‘सुळावरील पोळी’. माऊली म्हणते पुजा करायला पान- फूल- फळ हे निमित्त आहे. पुजा करायची मनापासून आवड असेल तरच भक्तीत्व सफल होते. “मी रामाचा, राम माझा” अशी मनापासून भावना लागते. विभक्त राहून देवापासून भक्ती संभवत नाही. गुरु-शिष्य असतील तर त्यांच्यात संवाद व्हावा लागतो. भक्तीच्या एका धाग्यात मन अंतर्मुख झालं की वैराग्य, घ्यावे लागते. ही भक्ती नवविध प्रकारची असते. त्यात श्रवण, कीर्तन, नामस्मरण, सद्गुरु अर्चन, वंदन, दास्य, सख्यभाव व आत्मनिवेदन या नऊ पायऱ्या येतात व या सर्व मिळून होणाऱ्या भजनाला भक्ती म्हणतात.

भक्ती सारखेच ‘ज्ञान’ ही पवित्र असते. पण विद्यापठण केले, संगीतशास्त्र शिकले, वैदिकशास्त्राच अध्यापन केले म्हणजे ज्ञान मिळवलं असं नाही. संगीतशास्त्र, रागज्ञान, नाना व्यवसायाचे ज्ञान किंवा शब्द, अर्थ, भाषा याची परीक्षा, नाना वर्णांची किंवा लेखन परीक्षा म्हणजेही ज्ञान नव्हे. काव्यकला, संगीतकला, नृत्यकला, सभाचातुर्य, शब्दकळा अशा अन्य अनेक चौसष्ट कलांचे ज्ञान किंवा चौसष्ठ विद्यांची सिद्धी म्हणजे ज्ञान नव्हे. “ऐक ज्ञानाचे लक्षण I ज्ञान म्हणजे आत्मज्ञान I पहावे आपणासि आपण I या नाव॔ं ज्ञान II” समर्थांनी आपल्या दासबोधात हे सुंदर विवेचन केले आहे. मुख्य देवास जाणावे व आपले सत्यस्वरूप ओळखावे. अनित्याचा त्याग करून सत्यरूप शाश्‍वत ओळखणे म्हणजे ज्ञान.

ध्यान हे तसेच अवघड. सतत काहीतरी करत राहणे हे मनुष्य प्राण्यास आवडते. तो त्याचा सहजधर्म आहे. पण एका ठिकाणी रोज विशिष्ट वेळेस अर्धा तास शांत स्वस्थ बसणे व आपल्या स्वरूपाचा शोध घेऊन तेथेच स्थित राहणे ही गोष्ट अतिशय कठीण आहे. कारण अर्जुन कृष्णाला म्हणतो, “अरे हे मन अतिशय चंचल असुन आवरायला अवघड आहे” पण पुढे जाऊन एक सत्य आहे मनाला ज्याची गोडी लावावी लागते. म्हणून काही क्षण त्याला भक्तीची, नामाची, ध्यानधारणेची आवड लावावी. पण हे किती लोक करत असतील कोणास ठाऊक ? म्हणून समर्थ म्हणतात, “नसे भक्ति, ना ज्ञान, ना ध्यान काही” पुन्हा कपाळावर आठी घालून हे जमत नाही तर सप्रेमाने सार घडावं लागत. नाम प्रेमाने, पूजा प्रेमाने, ध्यानधारणा प्रेमाने, तर त्याच्या पोटी कित्येक काळानंतर ‘ज्ञान’ उदयास -जन्मास येते. यासाठी रामभक्तीत रंगून गेले पाहिजे. मीराबाई म्हणतात तस,”जहाॅ देखो वहाॅ शाम” आणि त्याला शोधता-शोधता मी स्वतःच श्याम झाले असं व्हायला हवं. तो राम विश्वाचा विश्राम आहे. त्याच्या चरणी मग आपल्याला शांती, समाधान लाभणार नाही का ? पण प्रेमाने जर साधनाच घडली नाही तर मग फलप्राप्तीची अपेक्षा का धरावी?

समर्थ पुढे म्हणतात, असा मी दीन भक्त आहे. तू माझा भार घ्यावास. रघुराया समर्थ आहे. हा जीव अज्ञानी आहे. जन्मा जन्मांतरीचा अहंभाव नष्ट करणे ही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे या दासाची लाज तु सांभाळ. नाही तर त्याची स्थिती दैन्यवाणी राहिल. सयंम मला ठाऊक नाही. तर उपासना हातून घडत नाही. राग तर माझ्या नाकावरच आहे. आता तु हाताशी धरशील तर काही माझी अवगुणं नाहीशी होतील व भवसागरातून पैलपार नेण्यासाठी तूच मला सहाय्य कर. अरे माझ्यासाठी या रघुरायाला किती शीण होणार आहे, किती कष्ट होणार आहेत याची मला कल्पना आहे. समर्थांनी ‘दीन’ हा शब्द दुर्बल, पीडाग्रस्त, व्याधीग्रस्त या अर्थाने वापरला नाही तर अवगुणी, पतित, तुझ्या पेक्षा असमर्थ असा भक्त आहे. पण तुझ्या दिव्य असणाऱ्या पावनपदी आलो आहे. तुझा दास म्हणवून घेत असल्याने माझी सर्व जबाबदारी तुझ्यावर आहे.”मज कोवसा राम कैवल्य दाता” माझा सांभाळ करणारा एक रामच सर्वसमर्थ आहे. त्याच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्याचं नाव घेत राहणं हाच एक उपाय आहे.

II जय जय रघुवीर समर्थ II
लेखिका – भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या