Wednesday, September 28, 2022

सदा सर्वदा राम सोडूनी कामी I समर्था तुझे दास आम्ही निकामी II

- Advertisement -

करुणाष्टक- 23

- Advertisement -

सदा सर्वदा राम सोडूनी कामी I
समर्था तुझे दास आम्ही निकामी II
बहु स्वार्थबुद्धीने रे कमालीचं I
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो II

- Advertisement -

- Advertisement -

चौर्‍याएंशी लक्ष योनी फिरून लाभलेला हा देह, मग आपल्या मुखकमलाने सुंदर असे रामाचे नाव का घेऊ नये? त्यात कोणते कष्ट आहेत ? एकही पैसा त्यासाठी लागत नाही किंवा हृदयात सर्व सुखाचा आराम तो “राम” असताना आम्हा भ्रातांना “विषयाचा” हव्यास का सुटत नाही? याचे उत्तर, आमच्या कामना संपतच नाही. व्यक्तींना महत्त्वाकांक्षी जरूर असाव पैसा, शिक्षण, घरदार, मूलबाळ हा सारा ‘इहलोक’ तर उत्तम असावाच पण त्याच बरोबर ‘परलोक’ दुर्लक्षून चालत नाही.

श्रीरामाची नित्य पूजा करून स्तुतिस्तोत्रे म्हणणे एवढाच परलोक किंवा परमार्थ साधणे याचा अर्थ नाही तर मर्यादा पुरुषोत्तम राम त्याचे दैवीगुण, दैवी संपत्ती आपणही अंगी बाणली पाहिजे. अविवेक, आळस, असावधानता, अनिती, अन्याय, अधर्म ही आसुरी संपत्ती त्यागुन विवेक, प्रयत्न, अखंड सावधानता, निती-न्याय, धर्मशीलता, वैराग्य आणि भक्ती याची कास धरली पाहिजे.”मी कर्ता- मी भोक्ता” ही अहंकाराची खूण, ती समुळ नाहीशी करून “राम कर्ता- राम भोक्ता” ही वृत्ती जोपासणे आवश्यकच आहे. हे जर नित्यानित्य विवेकाने साधले तर संसारी जन्माला आल्याचे सार्थक होते.

पण पुष्कळ वेळा असं घडतं, आयुष्यातील आपली वर्षानुवर्षे शिक्षण- व्यापार यासाठीच खर्ची होतात. त्यातील एक चतुर्थांश आवड व सवड आपण भगवंतासाठी देऊ शकलो तर ? बर साठीनंतर तरी “मी देवाचा, देव माझा” असं व्हावं तेही घडत नाही. बरं या दोन्ही गोष्टी जमल्या नाहीत तर संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधि न सोडिता जनामध्ये सार्थकता विचारेची होय? हा विचार तरी कोणता ? देव कोण तो ओळखावा आपुला आपण. शोध घ्यावा अंतर्यामी. शांत, स्वस्थ, निवांतपणे रोज दहा पंधरा मिनिट आपण अंतरंगात डोकावून “मी कोण” याचा शोध घ्यावा. अनेक मार्ग आहेत पण समर्थांना आपलं “तंत्र” ठाऊक आहे. आपण धावायचं थांबतच नाही.

भगिनी वर्गाला संपूर्ण कपाट भरून स्वत:च्या साड्या असल्या तरी त्या कमीच वाटतात.’नवीन लेटेस्ट’ कडे धाव असतेच. आपण आपली प्रकृती बदलून हळूहळू आपलं ‘शिल्प’ घडवायला हव, हे गावीच नसतं. आपला क्रोध, लोभ, अहंकार थोडा तरी कमी व्हायला हवा. कारण काहीही घडू दे आपण ‘रामा’ पासून दूर जात असतो.तो “कामधेनु”, “कल्पवृक्ष”, “कल्पतरू” त्याच्याकडे काय मागावं हेही कळत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, “सदासर्वदा राम सोडूनी कामी समर्था तुझे दास आम्ही निकामी”.

समर्थांना नुसता भक्तीचा पिंड नकोय तर त्यांचा दास हा समाजाचे प्रबोधन करणारा, धर्मकारण- राजकारण करणारा, कार्य करणारा कार्यकर्ता, उत्तम पुरुष, आदर्श राज्यकर्ता असा अभिप्रेत आहे. तो तसा नसेल तर निकामी ठरेल. एखादा देहाचा अवयव काही कारणाने काम करत नसेल तर निकामी ठरतो. तसा दास हा उत्तम गुणांचा नसेल तर समाजाला तो भारभूत ठरेल. म्हणून तो धर्मनिष्ठ, सामर्थ्य संपन्न, शिवाय रामपदी रंगलेले त्याचे जीवन हवय. पण हे वाटतं तितकं सोपं नसतं. कारण, त्याचं कारण समर्थ पुढे सांगत आहेत, “बहु स्वार्थ बुद्धीने रे कष्टविलो”. आज कुटुंब संस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रसंस्था यात ही याची (स्वार्थबुद्धीची) चित्रे स्पष्ट दिसतात. एक परदेशामधून उच्चशिक्षित आलेल्या तरुणाला विचारले, आता काय करणार? तो म्हणाला पहिल्यांदा मी माझे स्वतंत्र घर घेणार म्हणजे आई वडिलांना टाकून देणार.

आई-वडिलांच्या जीवावर हा शिकला तो पहिल्यांदाच सांगतो आई-वडिलांना टाकून देणार. माझ्या स्वतःचे घर निर्माण करणार आणि एखादा गुच्छ घेऊन नोव्हेंबर महिन्यामध्ये “मदर्स डे” ला आई वडिलांना भेटायला जाणार. कुटुंबसंस्था एकसंघ, प्रेमाची, आत्मविश्वास असलेली राहिलेली नाही. त्याचं प्रतिबिंब समाजात कस्टम ड्युटी न भरता वस्तूंची खरेदी विक्री करायची असेल तर खाजगीत विचारून ड्रॉवर उघडले जातात व व्यवहार होतात. हे चित्र सुखावह, सुशिक्षित व समंजसपणाचे निश्चितच नाही. हा असत् प्रवृत्तीचा वारसा आपण नकळत पुढच्या पिढीलाही देऊन जातो आवर्तन तसंच चालू राहतं . राष्ट्रातला दहशतवाद फोफावतो. हे सारं वातावरण मुश्किल होऊन जातं. म्हणून “माणूस” घडावा लागतो. प्रथम त्याच्या ठायी लागत शुचित्व, प्रेम, स्नेह, दया, करुणा, बंधुभाव, सामंजस्य आणि हे एक पक्षी नकोय व्यवहारात संबंधित येणाऱ्या उभय पक्षी कडून हे वर्तन घडलं पाहिजे.

आणि हे जर घडलं नाही तर त्याचा सरळ सरळ परिणाम म्हणजे दुःख व कष्टमय जीवन ! आपला मोठ्या उत्साहाने केलेला संसारही ‘नेटका’ न होता ‘रडका’ होतो. याचे कारण त्याचा पाया अहंतामूलक स्वार्थ हा असतो. तो नेटका करायचा तर स्वार्थाच्या पुढे जाऊन ‘परार्थ’ आणि त्याहीपुढे जाऊन ‘परमार्थ’ साध्य करणे आवश्यक आहे. परमार्थ हे अंतिम प्राप्तव्य असेल तरी त्याचा आशय “नेटका प्रपंचतून” व्यक्त होत असतो असे रामदास स्वामींना सुचवायचे आहे. म्हणून ते पुढे धोक्‍याचा इशारा मनाच्या श्लोकात देताना दिसतात, “बहु स्वार्थ बुद्धी रे कष्टविलो” याचा अर्थ तुझे जीवन अति स्वार्थी असेल तर तू निश्चितच पापी असशील व यानेच कुटुंबाची, समाजाची, राष्ट्राची, सारी घडी विस्कळीत होईल. आज समर्थांना अपेक्षित असलेला “दास” ,”भक्त” घरोघरी जन्माला यावा. दुर्जनांचा संहार करण्यासाठी तो स्वतः सज्जन व्हावा.

II जय जय रघुवीर समर्थ II
लेखिका- भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या