‘समाधानासारखे थोर नाही, नरदेह पुन्हा नाही’

0

करुणाष्टक- 18

सदा प्रेमराशी तयां भेटलासी I तुझ्या दर्शनें स्पर्शनें सौख्यराशी II
अहंता मनीं शब्दज्ञाने बुडालों I तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों II

“तू जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा मनपूर्वक प्रयत्न कर, मागाहून यश मिळेल” सुज्ञ माता-पिता अपेक्षा न ठेवता समजूतदारपणे असा उपदेश मुलाला करतात. समर्थ ही येथे भक्ताला प्रथम अट घालतात की तू प्रथम “प्रेममूर्ती” बनण्याचा प्रयत्न कर. मग फलश्रुती निश्चित आहे. तुला सौख्याच्या राशीची प्रचिती येईल.

सदा प्रेमराशी भक्तांनी कधीतरी प्रेमस्वरूप राहावं असं नाही तर तो नेहमीच प्रेमळ हवा कारण योग, ज्ञान, भक्तिला प्रेमाची जोड लाभली तरच ती फलद्रूप होते ना ?

नारदीय भक्ती सूत्रात नारदांनी त्याचं वर्णन ‘परमप्रेमस्वरूप’ असंच केलंय. प्रेमानेच तो आकळतो. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, “प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगामाजी” इतकी अनन्य भक्ती हवी की “मी रामाचा, राम माझा” अशी निष्काम भक्तीच रघुरायाची प्राप्ती करून देते. आई आपल्या लहान बाळाला भरविते तेव्हा एक घास काऊचा, एक घास चिऊचा, एक घास माऊचा करत तासभर तिचा कार्यक्रम चालतो. पण ती त्रासत नाही. हे काम प्रेमपूर्वक आई, माय माऊलीच करू जाणे. किती वेळ गेला याचा हिशोब ती ठेवत नाही. नंतर ती स्वतः जेवते. हा एक प्रकारचा त्यागच पण सहज व प्रेममय अशी भक्ती सप्रेमाने नकळत घडत जावी म्हणजे तो भगवंत ही प्रसन्न होऊन ‘अविर्भूत’ होतो. भक्ताला- दासाला कृतकृत्य करतो.

भगवंताचं दर्शन व त्याने मिळणारे सुख हे त्रिभुवनात लाभणार नाही. मग तो मर्यादापुरुषोत्तम, लावण्यरुपी घनश्याम असो किंवा हातात मुरली घेऊन देहभान हरपायला लावणारा भगवान गोपाल कृष्ण असो किंवा युगे अठ्ठावीस विटेवर उभा असलेला ‘बरवा विठ्ठल’ असो. श्रांत जीवांना त्यांच्या दर्शनाने लाभलेले सुख समाधान अवीट व अवर्णनीय असेच “ऐसे पाहता विभव नाही कोठे” असं संत तुकाराम महाराज वर्णन करतात. या आराध्य दैवतांच्या दर्शनाने जसे अमृतसुख लाभते. तसेच तपस्वी ऋषी, संत-महात्मे, उत्तम साधक यांचे दर्शनही ‘दर्शनाच्या प्रशस्ती पुण्यपुरूष’ असे ठरते. त्यांचे शांत, तृप्त , समाधानाने प्रसन्न व गुलाबाच्या फुला सारखे टवटवीत चेहरे आपल्या पेक्षा खचितच निराळे असतात. आपल्याला ही दहा-पंधरा हजार पगार असतो, स्वतःचा फ्लॅट असतो, सुंदर पत्नी असते, दोन मुलं असतात पण तरीही आपला चेहरा अप्रसन्न राहतो कारण आपल्या संसाराला भगवंताचे अधिष्ठान नसते.

म्हणून समर्थ ही म्हणतात “समाधाना सारखे थोर नाही” नरदेह काही पुन्हा पुन्हा प्राप्त होत नाही. आपलं प्राप्तव्य ‘समाधान’ हेच असावं. व दैवतं, संत, साधक यांच्या दर्शनांनी खरं समाधान लागतं. स्पर्शसुख आपल्याही परिचयाचे. मायेचा, प्रेमाचा स्पर्श झाडा फुलांनाही समजतो लहान मुलांनाही आणि पाळीव प्राण्यांनाही. पण दैवतांच्या, संतांच्या, सद्गुरूच्या स्पर्शात सामर्थ्य असते. श्री निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर माउलीच्या मस्तकावर हस्तस्पर्श करून कृपाशीर्वाद दिला व ते ‘गीतार्थाचे आवार’ जगासाठी खुले करू शकले. तर सेतू बंधनाच्या वेळेस इवल्याशा खारुताईने जो श्रमाचा मदतीचा वाटा उचलला तेव्हा प्रभू रामचंद्राने मोठ्या प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरविला. आजही तो स्पर्श घेऊन दिमाखाने तुरूतुरू धावत असते. तिच्या पाठीवरचे बोटांचे तीन पट्टे पाहून आपणही विस्मित होतो.

असेच हरी चिंतनात तल्लीन झालेले गोरा कुंभार माती तुडवीत होते. जवळच रांगत, खेळत असलेले एकुलते एक मुल मातीत आले, तुडविले गेले आणि मेले. नकळत झालेल्या या कृत्याचे प्रायश्चित्त म्हणून त्यांनी आपले हात तोडून घेतले. तेवढ्यात पंढरीची वारी आली श्रीज्ञानेश्वरांनी गोरोबांना पंढरीस आणले. पंढरपुरात विठ्ठला समोर नामदेवांचे कीर्तन उभे राहिले ते रंगले आणि सर्वांनी दोन्ही हात उंचावून विठ्ठलाचा गजर करावा असे म्हणताच गोरोबांनी अभावितपणे थोडे हात उचलले तो त्यांना हात फुटले आणि विठ्ठलाच्या पायाजवळ मेलेला मुलगा उभा असलेला दिसला. “तुझ्या दर्शनें, स्पर्शनें सौख्यराशी” याची ही रोकडी प्रचिती.

समर्थ यापुढे एक धोक्याचा कंदील दाखवतात. तू पंडित असशील, शब्दज्ञाने वेदान्ती असशील पण याचा जबरदस्त अहंकार तुला बुडवेल. इथे दुसरी कुठलीही शक्यता राहणार नाही. हे अहंकाराचं वारं तुला पार नेस्ताबुर करेल.”अहंता मनी शब्द ज्ञाने बुडालो”. सोळाशे वर्ष जगलेले, वेदांती, हटयोगी चांगदेव महाराज जेव्हा ज्ञानोबांना पत्र लिहिण्यास बसले, तेव्हा या वयाने लहान ज्ञानीयास आपण काय लिहावे? तीर्थरूप, साष्टांग नमस्कार कि अनेक आशीर्वाद. पत्राचे सुरुवात काय करावी ? अशी साशंक वृत्ती झाली व मनात अहंकार तळ ठोकून होताच. शेवटी त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. त्यांनी ज्ञानोबांना कोरे पत्र पाठविले. शेवटी लहानग्या ज्ञानी मुक्ताईच्या हा सारा प्रकार ध्यानी आला व ती म्हणाली, चांग्या इतके चौदाशे वर्ष जगलास पण तुझी पाटी कोरी ती कोरी. तिने त्याच्या डोळ्यात अंजन घातले व शेवटी चांगदेवानी मुक्ताईला सद्गुरु केले. ‘अहंकार’ हाच शत्रु माणसाला, “सद्गुरु ची मध्यस्थी कशाला ?” हा प्रश्न उपस्थित करतो. त्यामुळे आपलीही जीवन पाटी कोरी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही व हे जीवन व्यर्थ वाया जाऊ नये म्हणून समर्थ रामराया पाशी करुणा भाकीत आहेत.

II जय जय स्वामी समर्थ II

लेखिका – भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.