‘इमर्जन्सी’वर पंजाबमध्ये बंदी, कंगना राणौतचा संताप

0

पंजाब, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट अनेक अडथळ्यांनंतर अखेर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. मात्र पंजाबमधील अनेक थिएटर्समध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. यावरून कंगना यांनी संताप व्यक्त केला आहे.

अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत यांचा ‘इमर्जन्सी’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट अखेर आज (17 जानेवारी) थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला आहे. मात्र पंजाबमधील अनेक थिएटरमध्ये या चित्रपटाचे शोज रद्द करण्यात आले आहेत. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीसह (SGPC) शीख संघटनांनी या चित्रपटाचा निषेध केला आहे. हा चित्रपट पंजाबमध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली होती. त्यानंतर एसजीपीसीने मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडे पंजाबमध्ये ‘इमर्जन्सी’च्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली होती.

कंगना राणौत यांची पोस्ट

‘हा पूर्णपणे कला आणि कलाकारांचा छळ आहे. पंजाबमधील अनेक शहरांमधून असं वृत्त समोर येतंय की ही लोकं ‘इमर्जन्सी’ चित्रपट प्रदर्शित होऊ देत नाहीयेत. मला सर्व धर्मांबद्दल अत्यंत आदर आहे आणि चंदीगडमध्ये शिक्षण घेतल्यानंतर, लहानाची मोठी झाल्यानंतर मी शीख धर्माचं बारकाईने निरीक्षण केलंय. त्या धर्माचं मी पालन केलंय. हे पूर्णपणे खोटं आहे आणि माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी, माझ्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाला हानी पोहोचवण्यासाठी असा प्रचार केला जातोय,’ असं कंगना यांनी लिहिलंय.

Leave A Reply

Your email address will not be published.