कांदा उत्पादकांचे अच्छे दिन; तत्काळ मिळणार सल्ला…

0

 

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर आणि टी आय एच फाउंडेशन फॉर आय ओ टी, आयआयटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव सुपे (ता.बारामती, जि.पुणे) आणि परिसरातील कांदा उत्पादकांसाठी इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे कीड, रोगांचा प्रादुर्भाव आणि नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी मोबाईल संदेश प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या दोन्ही संस्था कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून कांदा उत्पादकांना सुधारित तंत्र, बदलत्या हवामानात होणाऱ्या संभावित नुकसानीचा अंदाज आणि उपाय योजनांबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आवश्यक असलेले इंटरनेट ऑफ थिंग्ज आधारित स्मार्ट इ-ॲग्री स्टेशन  मुंबईतील आयआयटी संस्थेतील टी आय एच फाउंडेशन फॉर आय ओ टी ने विकसित केले आहे. एका स्मार्ट इ-ॲग्री स्टेशनची स्थापना जळगाव सुपे येथे करण्यात आली. या प्रकल्पासाठी कांदा व लसूण संशोधन संचालनालयाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सुरेश गावंडे, वरिष्ठ शास्रज्ञ डॉ. राजीव काळे, युवा उद्योजक शिवम गायकवाड तसेच टीआयएच-आयओटीचे हर्ष सावर्डेकर, कौशिक लांडगे, निखिल महादये यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.

या प्रकल्पासाठी बारामती येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट चे चेअरमन राजेंद्र पवार, सीईओ प्रा. नीलेश नलावडे,कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ.धीरज शिंदे तसेच मृदा शास्त्रज्ञ डॉ.विवेक भोईटे हे सहकार्य करत आहेत.

टीआयएच-आयओटीने विकसित केलेले स्मार्ट इॲग्री स्टेशन हवामानातील संभाव्य बदल, कीड, रोगाच्या प्रादुर्भावाचा अंदाज तसेच सिंचन व्यवस्थापनासाठी आवश्यक जमिनीतील ओलावा, तापमान, सामू, खतांचे प्रमाण, सभोवतालचे तापमान आणि आर्द्रता, पाऊस, वाऱ्याचा वेग आणि सौर विकिरण आणि पानांची आर्द्रता यांची नोंद ठेवते. या नोंदीनुसार कांदा व लसूण संशोधन संचानालनातील तज्ज्ञ मार्गदर्शन पीक व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.