ओडिशा, लोकशाही न्यूज नेटवर्क
ओडिशामधून मोठी बातमी समोर आली आहे. ओडिशातील कटकजवळील नेरगुंडी रेल्वे स्टेशनजवळ बेंगळुरू-कामाख्या सुपरफास्ट एक्स्प्रेसचे ११ डबे रुळावरून घसरले आहेत. रविवारी सकाळी ११.५४ वाजता ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे तर 25 जण जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, या अपघातामुळे तीन रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली होती. ही घटना घडल्यानंतर रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. तसेच प्रशासनाकडून मदतकार्य सुरु करण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे. या घटनेनंतर अपघात मदत आणि वैद्यकीय मदत रेल्वे देखील घटनास्थळी रवाना करण्यात आली आहे.
https://x.com/ANI/status/1906267685928993130
दरम्यान, कामाख्या एक्स्प्रेसचे ११ डबे रुळावरून घसरल्याच्या या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. तसेच कामाख्या एक्स्प्रेस रेल्वे रुळावरून घसरल्यामुळे अनेक एक्स्प्रेसचे मार्ग वळवण्यात आले आहेत. तसेच या कामाख्या एक्स्प्रेसमधील प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच कामाख्या एक्स्प्रेस पुन्हा धावण्यासाठी योग्य दुरुस्तीचं काम सुरू असल्याचंही ईसीओआर अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
या घटनेबाबत ईस्ट कोस्ट रेल्वेचे सीपीआरओ अशोक कुमार मिश्रा यांनी सांगितलं की, आम्हाला कामाख्या सुपरफास्ट एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरल्याची माहिती मिळाली आहे. ११ एसी डबे रुळावरून घसरले आहेत. यात कोणीही जखमी झालेले नाही. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. आम्हाला माहिती मिळाल्यानुसार, अपघात निवारण गाड्या, आपत्कालीन वैद्यकीय उपकरणे पाठवण्यात आली आहेत. या बरोबरच जीएम/ईसीओआर आणि इतर उच्चस्तरीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. तसेच या अपघाताचे कारण चौकशीनंतर समोर येईल. त्या मार्गावर थांबलेल्या गाड्या वळवणे आणि पूर्ववत काम सुरू करणे हे आमचं पहिलं प्राधान्य आहे.