कल्याण टोलच्या बेलाड कार्यालयासमोर ग्रामस्थांनी ठेवला मृतदेह

0

 

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

दि. ९ फेब्रुवारी रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास घिर्णी-बेलाड रस्त्यावर टिप्पर दुचाकीच्या धडकेत एक दुचाकीस्वार ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली.

या अपघातात दुचाकीस्वार प्रदीप भरत निंबोळकर (२५) रा.बेलाड हा तरुण जागीच ठार झाला. तर गजानन त्रंबक संबारे (३२) रा.बेलाड हे जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ मलकापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर चालक अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला. तर संतप्त ग्रामस्थांकडून टिप्परच्या काचांची तोडफोड करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच मलकापूर शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले.

त्यानंतर १० फेब्रुवारी रोजी सकाळी अपघातातील मृतकाचे शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईक व ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेत थेट वडोदा फाट्यावरील कल्याण टोल कंपनीचे कार्यालय गाठले. जोपर्यंत मृतकाच्या परिवारास आर्थिक मदत मिळत नाही तोपर्यंत मृतदेह अंत्यविधी न करण्याची आक्रमक भूमिका त्यांनी घेतली.

दरम्यान आमदार राजेश एकडे, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीश रावळ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बंडू चौधरी, शहराध्यक्ष राजू पाटील यांनी कल्याण टोल कंपनीच्या अधिकार्‍यांशी चर्चा करीत चालकाच्या चुकीमुळे घडलेल्या अपघातात त्या कुटुंबातील कर्ता पुरुष मृत पावल्याने याप्रकरणी सहानुभूती ठेवत योग्य ती मदत केलीच पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेतली. चर्चेदरम्यान कंपनीकडून आर्थिक मदत देण्याची ग्वाही देण्यात आल्याने वातावरण निवळले.

यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिनव त्यागी, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी येथे दाखल झाले होते. तर कल्याण टोल इन्स्ट्रक्चर कंपनी समोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. वातावरण निवळल्यानंतर सदर मृतदेह अंत्यविधीकरिता नातेवाईक ग्रामस्थांकडून नेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here