कजगावात बंदुकीचा धाक दाखवून सराफास लुटण्याचा प्रयत्न…

0

 

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

तालुक्यातील कजगाव येथे संध्याकाळी साडे चार ते पाच वाजेच्या सुमारास दोन ते तीन अज्ञात बंदुकधारी हल्लेखोरांनी एका सराफाच्या दुकानात घुसुन बंदूक दाखवून सशस्त्र लुटण्याचा प्रयत्न केला मात्र व्यापाऱ्याने आरडाओरड केल्याने धाडसी दरोड्याचा प्रयत्न फसला आहे. ह्या सिनेस्टाईल सर्व प्रकाराने कजगाव येथे एकच खळबळ उडाली आहे. भर गर्दीच्या ठिकाणी घडलेल्या या खळबळजनक घटनेने गावात एकच चर्चेला उधाण आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, सराफ बाजारातील व्यापारी उमेश बोरा हे दुकानात असतांना दोन बंदुकधारी दुकानात शिरले व त्यांनी आपल्या जवळील बंदूक व्यापाऱ्याच्या दिशेने रोखली मात्र व्यापाऱ्याने प्रसंगवधान राखून वेळीच आरडाओरड केल्याने बंदुकधारी हल्लेखोरांनी हवेच्या वेगाने पळ काढला. मात्र या घडलेल्या धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र भर दिवसा सराफ व्यापाऱ्याच्या दुकानावर केलेला हल्ल्याचा प्रयत्न हा मोठा चर्चेचा विषय झाला आहे. गावातील मुख्य बाजारपेठ असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असते, सराफ बाजरात अनेक बँक देखील आहेत. येथे दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते मात्र, अश्या पद्धतीने होणारा सशस्त्र हल्ला पहिल्यांदाच झाला आणि तोही भरदिवसा, त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्यासह भडगावचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, गुन्हेशाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश चौबे यांनी पोलीस ताफ्यासह भेट देऊन पाहणी केली. यावेळी पोलीस कर्मचारी पोलीस हवालदार विलास पाटील, सचिन वाबडे, पो.ना नरेंद्र विसपुते, स्वप्निल चव्हाण, कैलास पाटील, विनोद पाटील, नरेंद्र शिंदे, गुन्हे शाखेचे लक्ष्मण पाटील आदी पोलिसांचा फौजफाटा होता.

बंदुकधारी भामटे हे नेरी मार्गे निमखेडी शिवार सोयगाव तालुका च्या दिशेने भरधाव गाडी घेऊन निघाले, मात्र कजगाव पोलीस मदत केंद्राचे पोलीस कर्मचारी नरेंद्र विसपुते यांच्या सह कैलास पाटील, विनोद पाटील, नरेंद्र शिंदे यांनी व भरधाव जाणाऱ्या गाडीचा पाठलाग यशस्वी रित्या केला व घटना घडण्याच्या तासाभरात गुन्ह्यात वापरलेली गाडी हस्तगत केली आहे. पोलिसांना गुन्ह्यात वापरलेली एम.एच.२० ई. ई.६४१३ या क्रमांकाची स्विप्ट व्हीडीआय ही गाडी सापडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.