कजगाव सबस्टेशनला भर दुपारी आग

मोठा अनर्थ टळला

0

कजगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

येथील विद्युत पुरवठा करणाऱ्या सब स्टेशनला दुपारी अचानक आग लागल्याने एकच धावपळ उडाली होती.  सदरील आगीचे कारण स्पष्ट झाले नसले तरी ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

दुपारी दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान भर उन्हात आग लागल्याने एकच पळापळ सुरू झाली होती. आगीचे प्रचंड लोळ आकाशात दिसून येत असल्याने गावकऱ्यांनी विद्युत वितरण करणाऱ्या सब स्टेशनकडे धाव घेतली होती. आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात ज्वाला फेकत असल्याने काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. भर उन्हाच्या तीव्रतेमुळे वरतून ऊन व खालून आग अशा परिस्थितीत विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी व  ग्रामस्थांनी मिळेल त्या भांड्यात पाणी घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला तर तब्बल एक तास उशिराने आलेल्या अग्निशमन दलाने तात्काळ आग आटोक्यात आणली.  मोठ्या मेहनतीने ग्रामस्थ व विद्युत वितरण कर्मचाऱ्यांनी व अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.

मात्र तब्बल एक तासांनी उशिरा आलेल्या दोन्ही अग्निशमन दलाच्या गाड्यांमुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती.  तसेच महावितरण कंपनीच्या आजुबाजूला मोठ्या प्रमाणात बिनकामाचे गवत असल्याने ते गवत पूर्णपणे  सुकले असून आग वाढत गेली. जर हे गवत वेळीच काढले असते तर आग काही प्रमाणात कमी झाली असती. मात्र महावितरण प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे गाव एक मोठ्या अपघातापासून वाचलेले आहे. कारण दोन्ही बाजूंनी पेट्रोल पंप अगदी हाकेच्या अंतरावर आहेत. मात्र लागलेल्या आगीने मोठ्या प्रमाणात भीती व्यक्त होत असतांना आग आटोक्यात आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता.

दरम्यान लागलेल्या आगीने प्रचंड लोळ वाढत चालले होते.  अशातच कर्मचाऱ्यांनी व नागरिकांनी अग्निरोधक बाटल्याद्वारे आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.  मात्र कार्यालयात सुरक्षेच्या दृष्टीने ठेवलेल्या अग्निरोधक बॉटल बीन कामाची  ठरल्याची चर्चा यावेळी दिसून आली.

Leave A Reply

Your email address will not be published.